कित्तूरसह राज्यात 21 ठिकाणी ईडीचे छापे
केपीएससीतील पशुवैद्यकीय अधिकारी भरतीतील गैरव्यवहार प्रकरण : गुजरातच्या अहमदाबादमध्ये झडती
त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर :
कर्नाटक लोकसेवा आयोगातील (केपीएससी) गैरव्यवहाराच्या आरोपाशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या तपासाचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी बेळगाव जिल्ह्यातील कित्तूरसह राज्यातील 21 ठिकाणी छापे टाकले. गुजरातच्या अहमदाबादमध्येही धाड टाकण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकारी नेमणूक प्रक्रियेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी केपीएससीचे निलंबित अध्यक्ष शिवशंकरप्पा साहुकार यांच्या निवासस्थानांवरही धाडी टाकून तपासणी करण्यात आली. शिवशंकरप्पा यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.
केपीएससीच्या अध्यक्षपदावरून निलंबित झालेले शिवशंकरप्पा साहुकार, तसेच केपीएससीच्या सदस्या शांता होसमनी, गैरव्यवहारातील मध्यस्थ, परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या डिजिटल मूल्यमापनाची जबादारी असलेले ‘एड्यूटेस्ट सोल्युशन्स’चे कार्यालय व पशुवैद्यकीय अधिकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या निवासस्थानांवर छापे टाकण्यात आले. बेळगाव, बेंगळूर, हासन, चित्रदुर्ग, दावणगेरे, रायचूर, कारवार, कलबुर्गी तसेच अहमदाबादमध्येही ईडीच्या पथकांनी छापे टाकून झडती घेतली.
कित्तूर शहरातील सदाशिवनगर कुबेर जायकनवर यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्रात आली. मंगळवारी सकाळी सुरक्षा पथकासमवेत ईडीच्या अधिकाऱ्यांनी कुबेर जायकनवर यांच्या निवासस्थानाची तपासणी केली. पशुवैद्यकीय अधिकारी पदाच्या परीक्षा गैरव्यवहारात कुबेर यांच्या बहिणीचा मुलगा अभिषेक महादेव देवलापूर याचा सहभाग असल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
तत्पूर्वी ईडीच्या पथकाने गोकाक तालुक्यातील घटप्रभा येथील अभिषेक यांच्या निवासस्थानी गेले. मात्र, त्याचे आई-वडील कित्तूरमधील नातेवाईकांच्या घरी असल्याची माहिती मिळताच अधिकारी तातडीने तेथे पोहोचले. तपासणीवेळी कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी सीआरपीएफचे तीन सशस्त्र जवान घटनास्थळी तैनात करण्यात आले होते.
बेंगळूरमधील केपीएससीच्या कार्यालयातही तपासणी
बेंगळूरमध्ये सीआरपीएफ जवानांच्या तुकडीसह चार वाहनांतून आलेल्या 15 हून अधिक ईडीच्या अधिकाऱ्यांनी केपीएससीच्या कार्यालयावर छापा टाकून तपासणी केली. तसेच बेंगळूरच्या डॉलर्स कॉलनीतील ‘होयसळ डीम्स’ अपार्टमेंटमधील शिवशंकरप्पा यांच्या फ्लॅट क्र. 304 वर छापा टाकण्यात आला. या कारवाईवेळी शिवशंकरप्पा यांचा मोबाईल ताब्यात घेऊन तपासणी करण्यात आली.
पदे मिळविण्यासाठी 80 लाखांची लाच?
केपीएससीमार्फत पशुवैद्यकीय अधिकारी भरतीसाठीच्या अंतिम निवड यादीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या आरोप आहे. या प्रकरणी बेंगळूर येथील विधानसौध पोलीस स्थानकात केपीएससीचे अध्यक्ष आणि सदस्यांविरुद्ध एकूण 4 एफआयआर दाखल करण्यात आले होते. मध्यस्थांनी अनेक उमेदवारांना पदे मिळवून देण्यासाठी प्रत्येकी 70 ते 80 लाख रुपयांची लाच मागितली होती. याला दुजोरा देण्यासाठी मध्यस्थांसोबतच्या संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग तक्रारदारांनी तपास यंत्रणेकडे सुपूर्द केले होते. प्रश्नपत्रिका फुटी, ओएमआर शीटमध्ये फेरफार आणि अंतिम निवड यादीत केपीएससी अधिकाऱ्यांच्या नातलगांना प्राधान्य देणे या गंभीर आरोपांची चौकशी सुरू आहे. सरकारने हे प्रकरण चौकशीसाठी सीआयडीकडे सोपविले आहे.
29 उमेदवार बेकायदेशीरपणे उत्तीर्ण
कर्नाटक लोकसेवा आयोगाने पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन विभागातील 400 पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी जानेवारी महिन्यात परीक्षा घेतली होती. 17 जुलै रोजी अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली. या यादीत, आयोगाचे अध्यक्ष, सदस्य आणि कर्मचारी यांचे नातेवाईक असलेले 29 उमेदवार उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. यापैकी काही उमेदवारांना मध्यस्थांमार्फत परीक्षेसंदर्भात पूर्वकल्पना देण्यात आली होते. त्यापैकी काही जणांच्या ओएमआर शीटमध्ये फेरफार करून निवड यादीत स्थान देण्यात आल्याचा आरोप आहे.