अण्णाद्रमुक नेत्याच्या ठिकाणावर ईडीचा छापा
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई
वृत्तसंस्था/ चेन्नई
ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासाच्या अंतर्ग बुधवारी अण्णाद्रमुकचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री वैथियलिंगम समवेत अन्य काही जणांच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. चेन्नई समवेत चार वेगवेगळ्या शहरामंध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. वैथियलिंगम यांना माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाते. तामिळनाडू आवास विकासमंत्री म्हणून वैथियलिंगम यांच्या कार्यकाळादरम्यान चेन्नई महानगर विकास प्राधिकरणाच्या कार्यांसाठी मंजुरी देण्याकरता झालेल्या आर्थिक व्यवहाराप्रकरणी ईडीकडून तपास सुरू आहे. माजी मुख्यमंत्री एडाप्पडी के. पलानिसामी यांच्या नेतृत्वातील गटाने वैथियलिंगम यांच्यासह पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. दक्षता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक संचालनालयाने मागील महिन्यात वैथियलिंगम आणि त्यांचे पुत्र व्ही. प्रभू यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला होता.