मुडा कार्यालयावर ईडीचा छापा बेंगळुरातही धाड
कारवाईत 20 हून अधिक अधिकारी सहभागी : महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात
प्रतिनिधी/ बेंगळूर
म्हैसूर नगरविकास प्राधिकरणाच्या भूखंड वाटप आणि पैशांच्या हस्तांतर प्रकरणासंबंधी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी म्हैसूर आणि बेंगळूरमध्ये छापे टाकले. मुडाच्या कार्यालयावर तडकाफडकी छापा टाकून जमीन व्यवहारासंबंधीची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी जमा केली आहे. या कारवाईमुळे मुडा अधिकारी आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची कोंडी झाली आहे.
मुडा प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांची पत्नी बी. एम. पार्वती यांच्यासह चौघांविरुद्ध लोकायुक्त पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर मुडाच्या भूखंड वाटपात कोट्यावधी रुपयांचा व्यवहार झाला आहे, अशी तक्रार म्हैसूरमधील सामाजिक कार्यकर्ते स्नेहमयी कृष्ण यांनी ईडीकडे केली होती. यासंबंधी स्नेहमयी कृष्ण यांनी 30 पानी कागदपत्रे ईडीच्या कार्यालयात दिली होती. त्यानुसार ईडीने मुडा कार्यालयाला 3 नोटिसा आणि एकदा समन्स बजावले होते. मात्र, समन्सला मुडाच्या अधिकाऱ्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे कार्यालयावर धाड टाकून महत्त्वाची कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली आहेत.
कारवाईत सुमारे 20 हून अधिक अधिकारी सहभागी झाले. त्यांनी मुडा आयुक्त रघुनंदन यांच्याकडून जमीन व्यवहारासंबंधीची माहिती जमा केली. मुडाकडून किती जणांना 50:50 या प्रमाणात भूखंड वाटप करण्यात आले? कोणाकोणाला जमिनी वाटप करण्यात आल्या? यासंबंधी कागदपत्रेही ईडीच्या अधिकाऱ्यांनी मागितली. कारवाईवेळी सुरक्षेसाठी 20 सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले. कार्यालयाचे मुख्य गेट बंद करून तपासणी करण्यात आली. त्यामुळे विविध कामांसाठी मुडा कार्यालयात आलेल्या नागरिकांना दिवसभर ताटकळत उभे राहावे लागले.
मूळ कागदपत्रांची मागणी
मुडाच्या भूखंड वाटपासंबंधी आधी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी पार्वती यांच्या जमिनीशी संबंधित मूळ कागदपत्रे सादर करा, अशी ताकिद ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुडाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यावर नक्कल प्रत पुरेसे आहे, असे सांगण्यात आले. त्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी मूळ कागदपत्रेच सादर करा, अशी सूचना दिली. 2004 पासून 2023 पर्यंतची मुडाच्या जमीन व्यवहारासंबंधी कागदपत्रे तपासण्यात आल्याचे सुत्रांकडून समजते.
म्हैसूरपाठोपाठ बेंगळूरमधील केंगेरी येथेही ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. मुडा प्रकरणातील चौथे आरोपी देवराजू यांच्या निवासस्थानावर छापा टाकून अधिकाऱ्यांनी महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. याशिवाय म्हैसूर तहसीलदार कार्यालयातील कागदपत्रांचीही तपासणी करण्यात आली.
तपासाला सहकार्य करणार!
ईडीकडून होत असलेल्या तपासाला सर्वप्रकारे सहकार्य करण्यात येईल. ईडीने मागितलेली कागदपत्रे सादर करणार आहे, असे मुडाचे सचिव प्रसन्नकुमार यांनी सांगितले. मुडाच्या कार्यपद्धतीविषयी प्राथमिक माहिती मागितली आहे. कारवाईविषयी उघडपणे माहिती न देण्याची सूचना आहे, असेही प्रसन्नकुमार यांनी सांगितले.
सिद्धरामय्या आणखी अडचणीत
मुडा कार्यालयाची झडती घेतलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निवासस्थान आणि कार्यालयावर कोणत्याही क्षणी छापा पडण्याची शक्यता आहे. शिवाय समन्स बजावून सिद्दरामय्यांना चौकशीला हजर राहण्याची सूचना देण्यात येण्याची शक्यताही आहे. यामुळे मुडा प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणखी अडचणीत आले आहेत.
छाप्यामागे राजकारण नाही : आर. अशोक
ईडीच्या छाप्यामागे राजकारण दडलेले नाही. 3-4 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे काँग्रेस नेत्यांचीच सांगितले होते. सिद्धरामय्यांसह सुमारे 1200 हून अधिक भूखंडांच्या बाबतीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार आहे. त्यामुळेच ईडीने धाड टाकली आहे. मुडाचे अध्यक्षपद सांभाळलेल्या काँग्रेस नेते मरिगौडा यांनी गैरव्यवहार झाल्याचे पत्रात म्हटले होते. त्यानंतर स्नेहमयी कृष्ण यांनी ईडीकडे तक्रार दिली होती. त्यामुळे यात राजकारण होण्याचा प्रश्नच उदभवत नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आर. अशोक यांनी दिली.