For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावमधील गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी ईडीकडून मंगळुरात खटला

01:08 PM Dec 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
बेळगावमधील गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी ईडीकडून मंगळुरात खटला
Advertisement

बेंगळूर : बेळगावमधील अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून शाम मनगुतकर, शिवानंद दादू कुंभार आणि तानाजी शाम मनगुतकर यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) खटला दाखल केला आहे. ईडीच्या मंगळूर उपविभागीय कार्यालयाने पीएमएलए कायदा-2002 अंतर्गत तिघांविरुद्ध 16 डिसेंबर रोजी मंगळूरमधील तृतीय जिल्हा आणि सत्र न्यायालयात खटला दाखल केला आहे. ईडीने बुधवारी या संदर्भात पत्रक जारी केले आहे. बेळगाव सीईएन विभागाच्या पोलिसांनी भारतीय दंड संहिता-1860 च्या सेक्शन 406 आणि 420 अंतर्गत शिवानंद दादू कुंभार आणि यल्लाप्पा शाम मनगुतकर यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. याच्या आधारे ईडीने प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

Advertisement

प्रमुख आरोपी यल्लाप्पा शाम मनगुतकर आणि शिवानंद दादू कुंभार यांनी तानाजी शाम मनगुतकर याच्या मदतीने बेळगावस्थित अनेक गुंतवणूकदारांकडून सुमारे 31.09 कोटी रुपये जमा केले होते. ही रक्कम शिवानंद कुंभार याच्याकडून चालविल्या जाणाऱ्या पोलाद आणि सिमेंट व्यवसायात वापरण्यात येणार होती. सदर रकमेच्या मोबदल्यात गुंतवणूकदारांना महिन्याला 8 टक्क्यांपर्यंत व्याज देण्याचे आश्वासन देऊन आरोपींनी गुंतवणूकदारांकडून पैसे जमा केले होते. आरोपींनी बहुतेक रक्कम रोख स्वरुपात घेतली होती, असे तपासातून उघडकीस आल्याचे ईडीने म्हटले आहे. आरोपींनी दिलेल्या आश्वासनानुसार व्याज आणि गुंतवलेली रक्कम परत न करता गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. आरोपींनी आपल्या बँक खात्यांमार्फत जमा केलेली रक्कम वैयक्तिक कारणांसाठी वापरल्याने ईडीने पत्रकात म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याने ईडीने म्हटले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.