ईडी-बॅनर्जी वाद सर्वोच्च न्यायालयात
ईडीकडून याचिका, तर ममता बॅनर्जी यांच्याकडून कॅव्हेट सादर, अधिकारी यांची बॅनर्जी यांना नोटीस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली, कोलकाता
प्रवर्तन निदेशालय (ईडी) विरुद्ध ममता बॅनर्जी हा वाद आता चांगलाच चिघळला आहे. ईडीने बॅनर्जी यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे, तर या याचिकेवर कोणताही निर्णय आपली बाजू ऐकून घेतल्याखेरीज दिला जाऊ नये, अशी मागणी करणारे कॅव्हेट बॅनर्जी यांनी सादर केले आहे. कलकत्ता उच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर पडली आहे. तर पश्चिम बंगाल मधील भारतीय जनता पक्षाचे नेते शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना अवमानना केल्याच्या संदर्भात नोटीस पाठविली आहे. राज्यात विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आलेली असताना नाट्यामय घडामोडी घडत आहेत.
तीन दिवसांपूर्वी ईडीने कोलकाता येथे ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार प्रतीक जैन यांच्या घरावर आणि कार्यालयावर धाडी घातल्या होत्या. त्या धाडी पश्चिम बंगालमधील कोळसा घोटाळ्याशी संबंधित होत्या. त्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता, असे ईडीचे म्हणणे आहे. मात्र, ईडीने आमच्या निवडणूक धोरणासंबंधीच्या फाईल्स हस्तगत केल्या आहेत, असे ममता बॅनर्जी यांचे प्रतिपादन आहे. धाड घातली जात असताना, ममता बॅनर्जी यांनी मोठे पोलीसदल घेऊन व्यक्तीश: ईडीच्या कामात अडथळा आणला आणि महत्वाचे पुरावे त्या त्यांच्यासमवेत घेऊन गेल्या आहेत. हे पुरावे परत देण्याचा आदेश देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका ईडीने कलकत्ता उच्च न्यायालयात सादर केली होती. आता याच विषयावर ईडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
उच्च न्यायालयात गोंधळ
कलकत्ता उच्च न्यायालयात सध्या ईडी, प्रतीक जैन आणि ममता बॅनर्जी यांच्या याचिका प्रलंबित आहेत. या सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी करण्याचा उच्च न्यायालयाचा विचार आहे. मात्र, शनिवारी ही सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय उच्च न्यायालायने घेतला. कारण न्यायालयात सुनावणीला प्रारंभ झाल्यानंतर प्रचंड गोंधळ माजविण्यात आला. या बेशिस्त प्रकारामुळे उच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय घोषित केला. त्यानंतर आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे. येथे लवकरात लवकर सुनावणी होणे शक्य आहे.
शुभेंदू अधिकारी यांची नोटीस
पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना अवमानना नोटीस पाठविली आहे. राज्यातील कोळसा घोटाळा भारतीय जनता पक्षाच्याच नेत्यांनी केला आहे. या घोटाळ्यातून मिळालेले पैसे दिल्लीत अमित शाह यांच्याकडे पोहचविला, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी केला होता. ममता बॅनर्जी यांनी 72 तासांमध्ये या नोटीसीला उत्तर द्यावे. अन्यथा, त्यांच्या विरोधात मानहानीचा अभियोग सादर करण्यात येईल, असे अधिकारी यांनी या नोटीसीत स्पष्ट केले असून त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
तापले राजकारण...
गेल्या चार दिवसांमध्ये घडलेल्या या घडामोडीचे मोठे पडसाद राज्याच्या राजकारणावर पहावयास मिळत आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले आहेत. ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी कोलकाता येथे ईडीच्या विरोधात ममता बॅनर्जी यांनी मोर्चाचे आयोजन केले होते. या आंदोलनात त्यांचे समर्थक असणारे चित्रपट कलाकारही समाविष्ट झाले होते. या मोर्चात केंद्र सरकार आणि ईडीच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली. दिल्लीतही तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरासमोर धरणे धरले होते. आता या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयातच पडदा पडणार अशी चर्चा आहे.
एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप
ड पश्चिम बंगालमधील कोळसा घोटाळ्याला आता गंभीर राजकीय वळण
ड बॅनर्जी यांनी नियम भंग केल्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांनी केला आरोप
ड येत्या चार महिन्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये होणार विधानसभा निवडणूक
ड कोळसा घोटाळ्यासंदर्भात बॅनर्जी यांचे शुभेंदू अधिकारी यांच्यावर आरोप