केजरीवाल यांना अटक; देशभरात निदर्शने
मद्य धोरण प्रकरणात ईडीची कारवाई : अटकेपासून दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
झाडाझडती....
- ईडीच्या अधिकाऱ्यांकडून निवासस्थानी अडीच तास चौकशी
- चौकशीला योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने अटकेचा निर्णय
- आप कार्यकर्ते-समर्थकांचे अटकेविरोधात जोरदार आंदोलन
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दिल्लीतील बहुचर्चित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री अटक केली. दिल्ली उच्च न्यायालयाने गुऊवारीच अरविंद केजरीवाल यांना अटकेतून अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात कारवाईचा फास आवळण्यात आला. गुरुवारी सायंकाळी ईडी अधिकाऱ्यांचे पथक कडक सुरक्षा बंदोबस्तात केजरीवाल यांच्या अधिकृत निवासस्थानी पोहोचले होते. जवळपास दोन-अडीच तासांच्या चौकशीनंतर त्यांना ईडीकडून अटक झाली. रात्री उशिरापर्यंत त्यांची वैद्यकीय चाचणी करण्याची प्रक्रिया सुरू होती. आता शुक्रवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. ईडीचे दहा अधिकारी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी तपास यंत्रणांकडून संपूर्ण घराची झडती घेण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली. सुरुवातीला केजरीवाल यांची निवासस्थानीच चौकशी केली जाणार असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले. चौकशीला योग्य प्रतिसाद न दिल्यास त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कोसळली. निवासस्थानातील चौकशीदरम्यान त्यांचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला होता. तसेच त्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, ईडीच्या कारवाईनंतर केजरीवाल यांच्या कायदाविषयक सल्लागारांनी गुरुवारी रात्रीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेत अटकेच्या कारवाईला लगाम लावण्याचे प्रयत्न सुरू केले होते.
तुरुंगातून सरकार चालविण्याची तयारी
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकारने तपास यंत्रणांना हाताशी धरून ही कारवाई केल्याचा दावा आपच्या मंत्री आतिशी यांनी केला. तसेच केजरीवाल यांना अटक झाली असली तरी मुख्यमंत्रिपदी तेच राहणार असून सरकार तुरुंगातून चालविले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आप कार्यकर्त्यांची निवासाबाहेर गर्दी
ईडीचे पथक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज तेथे पोहोचले. मात्र, नियमानुसार छापा टाकलेल्या आवारात कोणालाही जाण्यास मनाई करण्यात आली. निवासात प्रवेश न दिल्यामुळे सौरभ भारद्वाज बाहेरच थांबले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांसह आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही निवासाबाहेर गर्दी होऊ लागली. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती. तसेच संभाव्य अटक टाळण्यासाठी समर्थकांनी रस्त्यावरच ठाण मांडल्याचे चित्र दिसून येत होते. वाढत्या गर्दीमुळे सदर भागात सुरक्षा सतर्कताही वाढविण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय
ईडीच्या कारवाईनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला होता. यानंतर केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. आता शुक्रवारीच केजरीवाल यांची कायदाविषयक टीम सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन आपली बाजू मांडणार असल्याचे स्पष्ट होत आहे. ईडी अरविंद केजरीवाल यांना अटक करेल अशी भीती आम्हाला होतीच. त्यामुळे आता आम्ही सर्वोच्च न्यायालयात जात असून लवकरात लवकर सुनावणीची मागणी करणार आहोत, असे सहकारी मंत्री सौरभ भारद्वाज यांनी सांगितले.
उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या समन्सला आव्हान देणाऱ्या याचिकेत अंतरिम दिलासा मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने आपल्याला ईडीच्या अटकेतून अंतरिम दिलासा द्यावा, अशी केजरीवाल यांची इच्छा होती. मात्र, त्यांना अंतरिम दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दर्शवला. आता हा अर्ज केजरीवाल यांच्या मुख्य याचिकेसोबत सूचीबद्ध करण्यात आला असून त्यावर 22 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. या नव्या अंतरिम याचिकेवर न्यायालयाने ईडीकडून उत्तर मागितले आहे.
मद्य धोरण घोटाळा प्रकरण
दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण 2021-22 साठी दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणाच्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. हे वादग्रस्त धोरण नंतर रद्द करण्यात आले. लेफ्टनंट गव्हर्नर व्ही. के. सक्सेना यांच्या शिफारशीनंतर सीबीआयने कथित भ्रष्टाचार प्रकरणात एफआयआर नोंदवला. तसेच ईडीने मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी सुरू केली. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याबाबत सीबीआय आणि ईडीने केलेला तपास आतापर्यंत अनेक बड्या राजकारण्यांपर्यंत पोहोचला आहे. याप्रकरणी ईडीने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि खासदार संजय सिंह यांना अटक केली आहे. तसेच माजी मंत्री सत्येंद्र जैनही तुऊंगात आहेत. याच प्रकरणात गेल्या आठवड्यात तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी के. कविताला अटक करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही तपास यंत्रणाच्या रडारवर आले आहेत.