इंदिरा किटच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू पुरविण्याची मागणी
बेळगाव : देशात महागाई गगनाला भिडली असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. यासाठी शासनाकडून रेशनधारकांना 10 किलो तांदूळ वितरण करण्यात येत आहे. मात्र याऐवजी राज्य सरकारने नागरिकांना इंदिरा किटच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू पुरवाव्यात, अशी मागणी रायबाग तालुक्यातील सर्वधर्म सामाजिक हितचिंतक संघटनेच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. राज्य शासनाने इंदिरा किटच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना 3 किलो मका, 2 किलो गहू, 1 किलो मूग, 1 किलो खाद्यतेल, 1 किलो साखर, चहा पावडर, 1 किलो मीठ, 1 किलो मूगडाळ, 1 किलो गूळ देण्यात यावे. यामुळे नागरिकांची काही प्रमाणात महागाईची झळ कमी होणार आहे. यासाठी राज्य सरकारने याची गंभीर दखल घेऊन सदर साहित्य पुरविण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी महम्मदहुसेन मुजावर, यासीन बागसिराज, गौस मुल्ला, अफताब मोमीन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.