शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती शेतीच्या उत्पादकतेवर अवलंबून
कृषीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन
वार्ताहर/काकती
नवीन तंत्रज्ञानाचा पुरेसा फायदा शेतकऱ्यांना व्हावा. कृषीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. देशाची व शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती शेतीच्या उत्पादकतेवर अवलंबून आहे, असे प्रतिपादन बेळगाव विभागीय कृषी उपनिर्देशक ए. बी. कोनवाड यांनी केले. कृषी उपनिर्देश कोनवाड यांनी काकती रयत संपर्क केंद्र परिसरातील गावांना भेटी देवून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाहणी केली. या पाहणीवेळी शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष चर्चा करून अनुभव जाणून घेतले. कृषी खात्याच्या विविध योजना उपक्रमांबाबत मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट वाढविण्यासाटी काकती, गौंडवाड येथील 50 हेक्टर भात शेतीत पिकाला लागणारी सेंद्रिय खते, किटनाशक, फवारणीद्वारे सुक्ष्म अन्नघटक आदी निविष्ठा पुरविण्यात आल्याने शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादन घेतले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. यावेळी काकती रयत केंद्राचे कृषी अधिकारी अरुण कापशी म्हणाले, गेल्या एप्रिल महिन्यापासून शासनाच्या अनुदानातून शेतकऱ्यांना 75 पावर टिलर, स्प्रिंकलर 70 संच, पीव्हीसी पाईप 1000 नग, मिरची कांडप मशीन 2, पिठाची गिरणी 2, भात कापणी 7 मशीन, ट्रॅक्टरचे नांगर 2, रोटरव्हीटर 4, कुट्टी मशीन 4, औषधे, बी-बियाणे वितरीत करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.