भारत-अल्जीरियादरम्यान दृढ आर्थिक सहकार्य निर्माण व्हावे!
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दौऱ्यावर
वृत्तसंस्था/ अल्जीयर्स
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारत आणि अल्जीरिया यांच्यादरम्यान दृढ आर्थिक सहकार्याचे आवाहन केले आहे. आफ्रिकन देशाची वेगवान वृद्धी तसेच विस्तारित अर्थव्यवस्था विविध क्षेत्रांमध्ये अनेक संधी प्रदान करते असे उद्गार मुर्मू यांनी काढले आहेत.
अल्जीरियन-भारतीय आर्थिक मंचाला त्यांनी संबोधित केले आहे. ‘व्यवसाय करण्यात सुगमता’ आणण्यात भारताच्या वेगवान आणि प्रभावशाली प्रगतीवर त्यांनी भर दिला आहे. तसेच अल्जीरियाच्या कंपन्यांना भारताच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक फॉर द वर्ल्ड’ पुढाकारांमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे.
भारत-अल्जीरिया संबंधांना पुढे नेणे आमची संयुक्त मूल्ये, समान आव्हाने आणि परस्पर विश्वासावर आधारित आहे. अल्जीरियाची वेगवान वृद्धी आणि विस्तारित होत असलेल्या अर्थव्यवस्थेने विविध क्षेत्रांमध्ये अनेक संधी निर्माण केल्या आहेत. भारतीय कंपन्यांनी अल्जीरियाच्या अर्थव्यवस्थांच्या शक्यतांमध्ये गुंतवणूक करत रहावी असे मुर्मू यांनी म्हटले आहे.
भारत आणि अल्जीरियादरम्यान एकूण व्यापार 1.7 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा आहे. परंतु अद्याप दोन्ही देश स्वत:च्या आर्थिक संबंधांच्या पूर्ण क्षमतेचा वापर करू शकलेले नाहीत. भारताला स्वत:च्या अल्जीरियन भागीदारांसोबत स्वत:चे अनुभव सादर करण्यास आनंद होईल असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे..
तर यापूर्वी राष्ट्रपती मुर्मू यांनी अल्जीरियातील भारतीय समुदायाच्या सदस्यांना संबोधित करत तेथील अर्थव्यवस्थेतील त्यांच्या योगदानाचे कौतुक केले आहे. अल्जीरियात भारतीय समुदाय हा भारताच्या हितसंबंधांना पुढे नेणारा एक सेतू असल्याचे उद्गार राष्ट्रपतींनी काढले आहेत. कुठल्याही भारतीय राष्ट्रपतीच हा पहिला अल्जीरिया दौरा ठरला आहे. मुर्मू या अल्जीरियानंतर मॉरिटानिया आणि मलावीचा दौरा करणार आहेत.