देवरायांचे पर्यावरणीय महत्त्व
आज जगभरात जीवाश्म इंधनाच्या अतिरेकी वापरामुळे कर्बवायू उत्सर्जनाचे प्रमाण कमालीचे वाढलेले असून त्यामुळे पर्यावरणीय प्रदुषणाचा कहर होण्याबरोबर तापमान वाढ कळीचा मुद्दा ठरलेला आहे. हवामान बदल आणि तापमान वाढ या मानवी समाजासमोर आऽवासून उभ्या असणाऱ्या समस्यांना सामोरे कसे जावे, या विवंचनेत आपण आहोत. शेकडो वर्षांपासून भारतीय लोकधर्माने आपल्या देवाच्या, मृत पूर्वजांच्या नावाने देवराया निर्माण केल्या आणि त्यांच्या माध्यमातून जल, जंगल, जमीन, जैविक संपदेचे संरक्षण केले होते. परंतु आज मानव केंद्रित विकासापायी आपण पूर्वजांचा वारसा विसरत चाललो आहोत.
एकेकाळी भारतभर समृद्ध आणि संपन्न अशा देवराया काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या होत्या आणि त्या त्या परिसरातील लोकसमूह त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी गुंतला होता. पूर्वजांनी स्थापन केलेल्या लोकदेवतांच्या माध्यमातून त्यांनी जे लोकसंकेत, लोकोत्सव निर्माण केले होते, त्यांनी या देवराया राखल्या होत्या. त्यातील औषधी वनस्पती आणि फळे, फुले, कंदमुळे यांचा संतुलित वापर करीत असताना, त्यांच्या पर्यावरणीय संवेदनशीलतेला राखले होते.
अश्मयुगीन आदिम समाजात धर्माची संकल्पना प्रचलित होती. परंतु त्या आदिम समाजाच्या धर्मविश्वात निसर्ग आणि पर्यावरणाच्या घटकांना विशेष स्थान होते. निसर्ग आपला दाता आहे, त्राता आहे आणि प्रतिकूल परिस्थितीत त्याने आपले रक्षण केले पाहिजे, ही भावना दृढ असल्याने निसर्गाचे पूजन करण्याची परंपरा विकसित झाली. जगभरातील आदिम समाज ज्याप्रकारे निसर्गातील विविध घटकांचे पूजन करीत होता, त्याचपद्धतीने भारतातील आदिमानवाने निसर्गाला सखा मानले आणि त्याच्याच ठायी देवत्व अनुभवले. निसर्गातल्या देवत्वातून धर्माशी निगडित श्रद्धा, विधी यांचा उगम झाला.
आपली भूक शमविण्यासाठी आदिमानवाने जंगली श्वापदांची शिकार जरी केली असली, तरी वृक्षवल्लींवरती अन्न, वस्त्र यांसाठी तो जितका विश्वासून होता, तितका त्याचा विश्वास अन्य घटकांकडे अभावानेच होता. वनस्पती या त्याला केवळ अन्न पुरवित नसत तर रोगराईच्याप्रसंगी आवश्यक औषधे पुरविण्यात व उन्हापासून सावली आणि आसरा प्रदान करण्याच्या दृष्टीने मदत करीत असत. यासाठी त्याने वनस्पतींचे प्राण्यांपेक्षा जास्त पूजन करण्यात धन्यता मानली. अश्मयुगीन मानवाने हरण, बैल, काळवीट, गवा रेडा इ. जंगली श्वापदांची प्रस्तर रेखाचित्रे प्रामुख्याने काढली असली, तरी वड, पिंपळ यासारख्या वृक्षांच्या पूजनालाही विशेष महत्त्व दिले. आदिम जमातीत झरी, वृक्ष, तळे, पशु-पक्षी यांच्या पूजनाची परंपरा होती. परंतु या पूजन परंपरेत वनस्पतींना प्राधान्य दिलेले होते. सिंधू संस्कृतीच्या शिक्क्यांवरती बैल त्याचप्रमाणे पिंपळ वृक्ष कोरलेला आढळला असून वृक्षाविषयी तत्कालीन समाजात असणाऱ्या धर्मश्रद्धेची कल्पना येते. भारतातल्या आदिम वसाहतकारांनी जो धर्म जोपासला, तो निसर्गाच्या तत्त्वांशी संबंधित होता आणि त्यासाठी त्यांच्या धर्मजीवनात निसर्ग केंद्रस्थानी होता. मानवात प्रचलित असलेल्या वृक्षपूजनाच्या परंपरेतून देवराईची संकल्पना उदयास आली. एकेकाळी गावोगावी देवराईची समृद्ध परंपरा होती; परंतु आज ही परंपरा दिवसेंदिवस दुर्बल होत असल्याने, सध्या अस्तित्वात असलेल्या देवरायांची स्थिती हलाखीची झाली आहे.
आदिम संस्कृतीतून भारतीय संस्कृतीने प्रेरणा घेऊन निसर्गपूजन परंपरा विकसित करून हा मुख्य गाभा सुप्रतिष्ठीत केला. भारतीय धर्मसंस्कृतीत असलेला दैवत परिवार निसर्ग पूजनातूनच आलेला आहे. भारतातल्या खेड्यापाड्यांत विखुरलेली लोकदैवते ही निसर्गातील विविध घटकांची प्रतिके आहेत. आकाश, वायू, तेज यासारख्या पंचमहाभूतांचे पूजन येथे विविध सण-उत्सवांप्रसंगी केले जाते. देवराई म्हणजे याच महान परंपरेचे वैशिष्ट्यापूर्ण उदाहरण असून देवराईच्या माध्यमातून येथील आदिम वसाहतकारांनी जैविक संपदेच्या नानाविध घटकांना पूर्ण संरक्षण प्रदान केलेले आहे. प्रत्येक गावात ग्रामदैवत अथवा अन्य लोकदैवताच्या नावाने एखादे जंगलक्षेत्र देवराई म्हणून आरक्षित करण्यात येत असे आणि पारंपरिक लोकधर्माच्या नियम, अटींद्वारे तिचे संवर्धन केले जायचे. वृक्षवेलींच्या ठिकाणी परमेश्वर नांदतो आणि त्यासाठी त्यांची कत्तल करण्यासाठी आदिम समाज सहज धजत नसे. कालांतराने शेती आणि अन्य कारणांसाठी जेव्हा त्याला जमिनीची नितांत गरज भासू लागली, तेव्हा त्यांची वक्रदृष्टी जंगलांकडे वळली. बरीच जंगले नष्ट होऊ लागली आणि तेव्हाच गावातले काही जंगलक्षेत्र वनराई म्हणून आरक्षित करण्याच्या परंपरेचा जन्म झाला असावा. देवराईची परंपरा जगभरातील आदिम समाजात ऊढ होती परंतु औद्योगिकीकरण आणि नागरीकरणाचा जेव्हा झपाट्याने प्रसार होत गेला आणि ऐहिक सुख-समृद्धीची लालसा मानवी समाजात विलक्षण वाढू लागली, तेव्हाच पारंपरिक लोकधर्म आणि त्याच्याशी निगडित विधी, परंपरा, श्रद्धा यांच्या मुळावर घाला घालण्यात आला. अल्पावधीत सुख, पैसा मिळावा म्हणून सुरू झालेल्या मानवी धडपडीत देवराईच्या जंगलसंवर्धन परंपरेला प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागले. वैज्ञानिक दृष्टी आणि ऐहिक सुखाची लालसा दिवसेंदिवस जशी प्रबळ होत गेली, तसतशी लोकधर्मावरची श्रद्धा क्षीण होत गेली आणि तिचा पहिला फटका बसला तो देवराईसारख्या परंपरेला. भारतातील बहुतांश आदिम समाजात देवराईची परंपरा रुढ होती. वार्षिक उत्सव किंवा सण वगळता अभावानेच माणसे देवरायांत जात असल्याने त्यांच्यात सहसा मानवी हस्तक्षेप कमी असे व त्यामुळे देवराया या जैविक संपत्तीच्या आगरच ठरल्या होत्या.
अश्मयुगीन समाज आजच्या संस्कृतीच्या परिभाषेत अडाणी, असंस्कृत मानला गेला असला तरी पापभिरू, भूतदयावादी असा हा समाज निसर्गाकडे व निसर्गातील घटकांकडे कृतज्ञतापूर्वक पाहत होता आणि त्यासाठी या समाजाने देवरायांचे श्रद्धेने रक्षण केले होते. आज मानव ऐहिक सुखाच्या लालसेत स्वत्त्व हरवून बसलेला असल्याने त्याला लोकधर्माचे, मानवी मूल्यांचे विस्मरण होत आहे.
डीट्रीच बेंद्रिस हा मूळ जर्मन, भारतात वनस्पतीशास्त्राचा संशोधक ब्रिटीश वनअधिकारी या नात्याने कार्यरत असताना त्याने इथल्या देवरायांचा अभ्यास करून, त्यांची वैशिष्ट्यो जगासमोर प्रकर्षाने मांडली. कर्नाटकातील देवराकडू, महाराष्ट्रातील देवराया यांचे महत्त्व नव्याने जगासमोर आणण्याचे काम त्यांनी केले होते. डॉ. दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी आपल्या लिखाणातून देवरायांचे पर्यावरणीय आणि सांस्कृतिक महत्त्व मांडलेले आहे. यंदा ज्यांची जन्मशताब्दी साजरी होत आहे. डॉ. वामन दत्तात्रय वर्तक आणि ज्येष्ठ पर्यावरण संशोधक डॉ. माधव गाडगीळ यांनी सह्याद्री परिसरातील देवरायांचा अभ्यास करून, त्याविषयी लेखन केले होते, त्यातून देवरायांची एकेकाळी असलेल्या समृद्ध परंपरेची कल्पना येते. आजच्या काळात देशभरातील देवरायांचे अस्तित्व संकटात सापडले असून हल्लीच सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना केलेल्या आहेत.
प्रदेशनिष्ठ आणि संकटग्रस्त वनस्पती आणि प्राणी यांचे देवराया या खरंतर आश्रयस्थान असून, आज नामशेष होणाऱ्या काही प्रजातींचे अस्तित्त्व अशा देवरायात आढळत आहे. औषधी गुणधर्मासाठी परिचित असलेल्या बऱ्याच वनस्पती, कंदमुळे, फुले, पाने यांचे दर्शन देवरायांत आढळत असल्याने, त्यांचे विशेष महत्त्व समजते. कित्येक दशलक्ष वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या मेरिस्टीका वनस्पतीचे अस्तित्व देवरायांत दृष्टीस पडत आहे, त्यावऊन त्यांचे विशेष स्थान अधोरेखित होते.
आज हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ या संकटांनी मानवी समाजाचे जीवन त्रस्त केलेले आहे. विविध प्रकारच्या विकास प्रकल्पांसाठी जंगलतोड केली जात असून, त्यात देवरायांचे अस्तित्व टिकविण्याचे आव्हान निर्माण झालेले आहे. जलसंचय क्षेत्राचे संरक्षण, मृदेचे आरोग्य वृद्धिंगत करण्यात देवराया जे योगदान करीत आहे, त्याविषयी माहिती आणि जागृती करण्यासाठी आवश्यक प्रयत्न झाले पाहिजे, अन्यथा आपल्या उरलेल्या सुरलेल्या देवराया नामशेष होतील.
- राजेंद्र पां. केरकर