महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘इंडिया’ला ग्रहण

06:24 AM Jan 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आकाशपाताळ एक करून विरोधकांत हमखास फूट पाडणार याची हमी भाजपाई देत होते. त्यांचे म्हणणे शंभर टक्के खरे ठरावे अशाच घटना घडू लागल्या आहेत. ‘पलटू राम’ या नावाने बिहारमधील त्यांच्या विरोधकांमध्ये कुचेष्टेचा विषय बनलेले मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लालू यादव यांची संगत सोडून भाजपचा हात पकडायचा निर्णय घेतला आहे. नितीश भाजपच्या कळपात शिरले हा विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीला निवडणुकीपूर्वी जबर झटका आहे

Advertisement

सरड्यापेक्षा रंग बदलण्यात नेते मंडळी पटाईत झाली तर राजकारण  रसातळाला जाईल अथवा कसे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. एक मात्र खरे

Advertisement

‘मी मरण पत्करेन पण भाजपबरोबर जन्मात कधी जाणार नाही’, असे अवघ्या 3-4 वर्षांपूर्वी आणाशपथा खाल्लेले नितीश हे एकदम असे पलटतील अशी सूतराम कल्पना काँग्रेससह कोणत्याच विरोधी पक्षाला आली नव्हती. इंडिया आघाडीची पहिली बैठक गेल्या जुलैमध्ये भरवून विरोधी ऐक्याचा एक प्रणेता बनलेले नितीश वरकरणी तरी आपल्याला काही नको. आपल्याला मोदी-शहा यांच्या भाजपला लोकसभा निवडणुकीत 50च्या आत गुंडाळावयाचे आहे असे सांगत होते. आता नितीश यांची वाटचाल एकनाथ शिंदे यांच्या मार्गाने चालू आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील नाट्या आणि थरार सध्या बिहारमध्ये दिसत आहे.

बिहारमध्ये कोण बरोबर अथवा कोण चूक यापेक्षा सगळेच बरोबर आणि सगळेच चूक असे होताना दिसत आहे. स्वत:चा अजेंडा नसला तर तो नेता कसला? आघाडीचे निमंत्रक बनण्याची 74-वर्षाच्या नितीशबाबूंची मनीषा होती. ताक मागायला जाताना ते भांडे लपवत होते. एकदाचे निमंत्रक झाले की ते पुढील पंतप्रधानदेखील होऊ शकतात असा त्यांचा सोयीस्कर समज होता. ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या इच्छेत खोड घातल्याने नितीश नाराज झाले आहेत असे मानले जात होते. लालूंनी आपल्याला हे पद मिळावे म्हणून काही केले नाही उलट ते आपलाच पक्ष तोडू लागले म्हणून ते रागावले होते. वारंवार टोपी बदलल्याने नितीश यांची विश्वासार्हता कमी झाली होती.

नितीशना भाजपकडे जाऊन काय लाभ होणार याबाबत बिहारचे भलेभले राजकीय जाणकार बुचकळ्यात पडलेले आहेत. नितीश यांचे एकेकाळी उजवे हात राहिलेले निवडणूक तज्ञ प्रशांत किशोर यांनी तर अशी जाहीर भविष्यवाणी केली आहे की बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही माकड चेष्टा केल्या तरी येत्या निवडणुकीत त्यांचे बारा वाजणार आहेत. नितीश ज्यांच्या बरोबर जातील त्यांचे देखील बिहारमध्ये बारा वाजतील, मग ते इंडिया आघाडी असो अथवा भाजप प्रणित रालोआ असा दावा किशोर यांनी केला आहे. नितीश यांच्या राजकारणाची सद्दी संपत आली असताना भाजपबरोबर जाऊन ते जर राजकीय आत्महत्या करत असतील तर त्यांना कोण बरे वाचवू शकतो असा सूर लावला जात आहे. कुमारस्वामी यांच्या निधर्मी जनता दलाप्रमाणेच त्यांची हालत होणार आहे. न घर का, न घाट का.

गेल्या आठवड्यात ज्या प्रकारे एकंदरीत घटना घडल्या त्यावरून इंडिया आघाडीचे दुकान बंद करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी साम, दाम, दंड, भेद असे सारे प्रकार एकाचवेळी वापरणे सुरु केले आहे की काय अशी शंका जाणकारांना आली नसती तरच नवल होते. मोदी-शहा हे एव्हढे घाग आहेत की विरोधकांतील कोण पक्ष आणि मंडळी म्हणजे ‘कमजोर कडी’ आहे हे त्यांनी पुरते ओळखून जाळ पसरावयाला सुरुवात केलेली आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बंगालमध्ये प्रवेश करत असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला तृणमूल काँग्रेस एकटाच निवडणूक लढवेल. भाजपचा पाडाव करण्यासाठी आम्हाला कोणाची गरज नाही, असे विधान करून विरोधकांना हादरवले आहे. राहुल यांची यात्रा राज्यात प्रवेश करत असतानाच ‘बंगालकरता एकटी ममता पुरेशी आहे’ अशा फलकांनी त्यांचे स्वागत केले गेले.  बंगालमध्ये या यात्रेचा प्रवेश होत असताना ‘मेरे अंगनेमे तुम्हारा क्या काम है’ असेच ममता सांगत आहेत.

या यात्रेला बंगाल तसेच उत्तर प्रदेश, बिहार यासारख्या राज्यात चांगला प्रतिसाद लाभला तर तेथील राजकारणच बदलणार आहे या भीतीने स्थानिक पक्ष व्यथित झालेले आहेत. मग त्या ममता असोत की समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव. मोदी सरकारच्या आणि भाजपच्या विरुद्ध ठामपणे केवळ राहुल गांधीच उभे ठाकले आहेत असा अल्पसंख्याक समाजाचा समज झाला असल्याने हा समाज मोठ्या प्रमाणावर काँग्रेसकडे आकर्षित झाला आहे. एव्हढेच नव्हे तर तो काँग्रेसबरोबर गोडीगुलाबीने घ्या असा आपल्यापरीने दबाव देखील इतर प्रादेशिक पक्षांवर टाकत आहे असे मानले जाते. आसाममधील भाजप सरकारने बरेच निर्बंध घालून देखील ही यात्रा तिथे यशस्वी ठरली हे बदलणाऱ्या राजकारणाचेच संकेत आहेत.

बंगालमध्ये 32 ते 34 टक्के अल्पसंख्याक समाज आहे आणि गेल्या दशकभरात ममतादीदी या त्याच्या नेत्या म्हणून पुढे आल्या आहेत. ग्रामीण बंगालमध्ये तृणमूलने चांगले हातपाय पसरवून हिंदू समाजातील मोठ्या वर्गालादेखील आपल्याकडे आकर्षित केलेले आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला चांगलीच धूळ चारल्याने मोदी-शहा हे नव्या दमाने तिथे कामाला लागले आहेत. ममतादीदींचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी हा पक्षामध्ये एक वजनदार नेता झाला आहे. अभिषेक हा ईडीच्या केसेसमध्ये अडकला असल्याने भाजप दीदींना ब्लॅकमेल करत काँग्रेसविरोधी भूमिका घेण्यास भाग पाडत आहे असेही बोलले जाते. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनीदेखील आपला आम आदमी पक्ष हा राज्यात स्वबळावर लढून भाजपचा मुकाबला करेल अशी घोषणा करून काँग्रेसला अडचणीत आणले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात 40 टक्के मते मिळवलेल्या काँग्रेसला खरे तर पंजाबमध्ये आपबरोबर लढायचेच नाही पण त्याची मजबूरी ही राजधानी दिल्ली आहे. आपबरोबर समझोता केल्याशिवाय तेथील सातपैकी एकही जागा काँग्रेसला जिंकता येणार नाही. दोघांचा समझोता झाला तर मात्र भाजपला प्रत्येक जागेकरता जबर मेहनत घ्यावी लागेल. सध्या सातही जागा भाजपकडे आहेत.

आपचे अरविंद केजरीवाल हे भरवशाचे खिलाडी मानले जात नाहीत. सध्या भाजपने त्यांना तुरंगात टाकायची वरचेवर धमकी देणे सुरु केल्याने ते तात्पुरते विरोधकांच्या कळपात आहेत एव्हढेच. कारण निवडणुकांची जोपर्यंत प्रत्यक्ष घोषणा होत नाही तोवर विविध डाव, प्रतिडाव खेळून आपल्या पोळीवर जास्त तूप पाडून घ्यायचा प्रयत्न सारेच पक्ष करतात. त्यात चूक काहीच नाही. हे राजकारण आहे. नेते म्हणजे संत मंडळी नव्हेत. काँग्रेसला भीती दाखवून आपल्या मनासारखे जागा वाटप करून घ्यायच्या रणनीतीचा हा भाग असू शकतो. वरवरती दिसणारे राजकारण हे हिमनगासारखे असते. हिमनगाचा 90 टक्के भाग पाण्याखालीच असतो. तो दिसत नसतो.

मोदी-शहा यांनी राष्ट्रीय स्तरावर सध्या आघाडी मारली आहे हे नि:संशय. पण अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनंतर देशभर प्रचंड राम लहर उसळली आहे असा दावा करणाऱ्या भाजपाला बिहारचे ऑपरेशन का करावे लागावे हा प्रश्न साहजिकच उठतो. पुढील महिन्यात जागा वाटप अंतिम होणार आहे. त्यानंतर प्रतिस्पर्धी किती पाण्यात आहेत ते कळणार आहे. आजघडीला ‘इंडिया’ पुढील आव्हान वाढलेले आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.

 

सुनील गाताडे

Advertisement
Tags :
##tarunbharat#akaluj #tarunbharatnews#social media
Next Article