भरपूर खा, पैसे मिळवा
अनोख्या ऑफरद्वारे महिलेने कमाविले 25 लाख
जगात एकाहून एक अनोख्या पेशांमध्ये लोक कार्यरत असून मोठ्या प्रमाणावर पैसेही कमावत आहेत. अलिकडेच एक महिला भरपूर खाण्याच्या बदल्यात मोठी रक्कम कमावून चर्चेत आली आहे. 29 वर्षीय रॅना हुआंगचा पेशाच जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन खाण्याचा आहे. परंतु हे काम तितके सोप नाही. कारण तिला हे सर्व खाद्यपदार्थ आव्हानाच्या स्वरुपात खावे लागतात. म्हणजेच जगात जेथे कुठे सर्वात वेगवान खाण्याची स्पर्धा असते तेथे ती विजयी होण्याच्या उद्देशाने पोहोचते.
अशा स्पर्धांमध्ये 35 मिनिटात 100 प्लेट्स सुशी आणि 70 मिनिटांत 17 पाउंड स्टेक खाण्याची अट सामील असते. ती 10 वर्षांपासून देशविदेशात जाऊन हे काम करत आहे आणि केवळ खाऊन सुमारे 25 लाख रुपये तिने कमाविले आहेत. लॉस एंजिलिसमध्ये रॅनाने अकिडेच 10 मिनिटात जवळपास 100 मोमो फस्त केले होते आणि 1 हजार डॉलर्सचा पुरस्कार मिळविला होता. तर आशियातील तैवान, जपान आणि व्हिएतनामच्या दौऱ्यावर असताना तिने स्पर्धेत भाग घेत स्वत:च्या 5 फूट 2 इंच इतक्या उंचीइतकी सुशी खाल्ली होती. 108 प्लेट्सइतके हे प्रमाण होते आणि तिने केवळ 35 मिनिटात ते संपविले होते.
मी माझ्या जीवनात खूप काही आणि अत्यंत वेगाने खाल्ले आहे आणि आता हे सोपे ठरले आहे. हे व्हिडिओ गेमच्या व्यसनामुळे शक्य झाल्याचे मला वाटते. बालपणी मी व्हिडिओ गेम खेळण्याच्या नादात पटापट खात होते. आता मी जवळपास दर दिनी रेस्टॉरंटमध्ये जाते आणि आव्हाने स्वीकारते. आता हेच माझे पूर्णवेळ काम झाले असून यातच मी आनंदी असल्याचे रॅनाने सांगितले आहे. 10 वर्षांपूर्वी हे सर्व सुरू करण्यापूर्वी रॅनाने ट्विच स्ट्रीमिंग आणि सिंगिंग समवेत सर्वप्रकारच्या नोकऱ्या करण्याचा प्रयत्न केला होता. मनोरंजन क्षेत्राचा हिस्सा होण्याचा प्रयत्न केला होता, मी कलाकार आणि गायिका होऊ इच्छित होते. ट्विचवर गेम स्ट्रीम करण्याचाही प्रयत्न केला होता. परंतु शेफ म्हणून काम करत असताना एक दिवशी कुणीतरी फूड चॅलेंज स्वीकारण्यास सांगितले आणि मी 6 मिनिटांत 4 पाउंडचा बरिटो फस्त केला होता. कुणीतरी माझ्या या कृतीला चित्रित केले होते आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर अशाप्रकारची आव्हाने स्वीकारण्यास सुरुवात केल्याचे ती सांगते.