पूर्व विभागाची अंतिम फेरीत धडक
दुलीप करंडक : मध्य विभागावर 4 गड्यांनी मात, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, मुकेश कुमार ठरले मध्य विभागासाठी कर्दनकाळ
वृत्तसंस्था/बेंगळूर
दुलीप करंडक उपांत्य सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी बंगालचे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मुकेश कुमार यांच्या भेदक गोलंदाजीला वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक खेळीची जोड मिळाली. या कामगिरीच्या जोरावर पूर्व विभागाने गतविजेत्या मध्य विभागाचा 4 गडी राखून पराभव करत दुलीप करंडकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सामन्यात 100 धावांत 7 गडी बाद करणाऱ्या पूर्व विभागाच्या मुकेश कुमारला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
2012-13 हंगामातील विजेते असलेल्या पूर्व विभागाचा सामना आता 6 सप्टेंबरपासून चेपॉक येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात दक्षिण विभाग किंवा उत्तर विभागाशी होईल. शमी आणि मुकेश यांनी मिळून सात बळी घेत मध्य विभागाचा दुसरा डाव 158 धावांत गुंडाळला. त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांची थोडी पडझड होऊनही पूर्व विभागाने 159 धावांचे लक्ष्य 6 गड्यांच्या मोबदल्यात गाठले. फिरकी गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर 159 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी पूर्व विभागाला भक्कम सुऊवात करणे गरजेचे होते.
सूर्यवंशीने (40 धावा, 43 चेंडू) दोन भिन्न छटा असलेली खेळी केली. त्याने सुऊवातीच्या 15 धावा 30 चेंडूंत केल्या, हे त्याच्या पहिल्या डावातील 42 चेंडूंतील अर्धशतकाच्या अगदी उलट होते आणि त्यात वेगवान गोलंदाज आर्यन पांडेविऊद्धच्या एकमेव षटकाराचा समावेश होता. मात्र उर्वरित 25 धावा त्याने केवळ 13 चेंडूंत केल्या, ज्यामध्ये आणखी एक षटकार व तीन चौकारांचा समावेश होता. दुसरीकडे, त्याचा सलामीचा जोडीदार अभिमन्यू ईश्वरन त्याच्यापेक्षा वेगाने धावा करत होता. त्याने ऑफस्पिनर सारांश जैनच्या गोलंदाजीवर लाँग ऑनच्या दिशेने षटकार फटकावला.
फिरकी गोलंदाजांविऊद्ध सावध पवित्रा घेणाऱ्या सूर्यवंशीला वेगवान गोलंदाज यश ठाकूरला पाहून जाग आली. कारण पहिल्या डावात त्याने ठाकूरच्या गोलंदाजीवर चार चौकार आणि दोन षटकार खेचले होते. या डावातही या डावखुऱ्या फलंदाजाने ठाकूरच्या एकाच षटकात (14 व्या षटकात) तीन चौकार आणि एक षटकार लगावला. मात्र त्याच षटकात तो बाद झाला; ठाकूरच्या गोलंदाजीवर रजत पाटीदारने धावत जाऊन एक अप्रतिम झेल टिपला.
सूर्यवंशी बाद होताच पूर्व विभागाच्या डावात शांतता पसरली. त्यानंतर नियमित अंतराने त्यांचे गडी परतू लागले आणि विजयाचे लक्ष्य सुऊवातीला वाटले होते त्यापेक्षा अधिक कठीण वाटू लागले. डावखुरा फिरकीपटू हर्ष दुबेने कुमार कुशाग्र आणि अनुकूल रॉय यांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद करून पूर्व संघाची अवस्था 5 बाद 124 अशी केली. मात्र त्यानंतर कर्णधार इशान किशनने (41 चेंडूंत नाबाद 39) मधल्या फळीत संयमी खेळी करत संघाला विजयापर्यंत पोहोचविले.
तत्पूर्वी, मध्य विभागाच्या संघाने 3 बाद 45 अशा धावसंख्येवरून पुढे खेळायला सुऊवात केली, पण त्यांची कामगिरी सुधारली नाही. पहिल्या सत्रातच त्यांनी उर्वरित सातही गडी गमावले. नववा फलंदाज बाद झाल्यानंतर हे सत्र 30 मिनिटांनी वाढवण्यात आले. भारतीय संघात सध्या स्थान नसलेले शमी (3/56) आणि मुकेश (4/44) हे दोन गोलंदाज मध्य विभागासाठी कर्दनकाळ ठरले. सामन्यात एकूण सात बळी घेणाऱ्या मुकेशला ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले. भारतीय संघातून बाहेर असलेल्या या वेगवान गोलंदाजासाठी हा पुरस्कार नक्कीच प्रोत्साहन देणारा ठरेल.
फलंदाजांना अडचणीत आणणाऱ्या आणि अकस्मात चेंडू उसळणाऱ्या खेळपट्टीवर या दोन अनुभवी गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत प्रतिस्पर्ध्यांची अवस्था 8 बाद 97 अशी करून टाकली. मात्र नवव्या गड्यासाठी दुबे आणि अर्शद खान यांच्यात झालेल्या 43 धावांच्या भागीदारीमुळे मध्य विभागाला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. या भागीदारीमुळे पूर्व संघाची काहीशी कसोटी लागली, पण त्यांचा विजय रोखता आला नाही आणि 2012-13 नंतर पहिल्यांदाच विजेतेपद मिळविण्याच्या दिशेने त्यांनी वाटचाल केली.
संक्षिप्त धावफलक
मध्य विभाग प. डाव 266, पूर्व विभाग प. डाव 266,मध्य विभाग दु डाव 50.2 षटकांत सर्वबाद 158 (मोखाडे 41, अर्शद खान 25, दुबे 24, रिंकू सिंग 20, अव ांतर 13, मुकेशकुमार 4-44, शमी 3-56, सरकार, रॉय, कुरेशी प्रत्येकी 1 बळी), पूर्व विभाग दु डाव 39.3 षटकांत 6 बाद 162 (सूर्यवंशी 40, इशान किशन नाबाद 39, ईश्वरन 24, कुशाग्र 22, घरामी 14, विराट सिंग 12, दुबे 4-53, ठाकुर व जैन प्रत्येकी 1 बळी).