For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पूर्व विभाग विजयासह उपांत्य फेरीत

06:50 AM Aug 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
पूर्व विभाग विजयासह उपांत्य फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था,  बेंगळूर

Advertisement

डावखुरा फिरकी गोलंदाज अंकुल रॉय आणि वैभव सूर्यवंशीच्या अचूक गोलंदाजीच्या मंगळवारी येथे झालेल्या 2026 च्या क्रिकेट हंगामातील दुलीप करंडक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पूर्व विभागाने इशान्य विभागाचा एक डाव आणि 210 धावांनी दणदणीत पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला.

पाच दिवसांचा हा सामना केवळ अडीच दिवसांत संपला. या सामन्यामध्ये पूर्व विभागाने पहिल्या डावात 467 धावांचा डोंगर उभा केला. पूर्व विभागाच्या शाहबाज अहम्मदने फलंदाजीत 167 धावांची खेळी तसेच गोलंदाजीत 4 गडी बाद करत या सामन्यात सामनावीराचा बहुमान मिळविला. पूर्व विभागाच्या भेदक गोलंदाजीसमोर ईशान्य विभागाचा पहिला डाव केवळ 111 धावांत आटोपला. त्यानंतर पूर्व विभागाकडून ईशान्य विभागाला फॉलोऑन मिळाला.

Advertisement

ईशान्य विभागाने बिनबाद 7 या धावसंख्येवरून तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचा दुसरा डाव 50 षटकांत 146 धावांत आटोपला. ईशान्य विभागाचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. ज्योतीन सिंगने 39 तर आकाश चौधरीने 27 धावा जमवित 9 व्या गड्यासाठी 39 धावांची भागिदारी केल्याने त्यांना दुसऱ्या डावात 100 धावांचा टप्पा ओलांडता आला. पूर्व विभागाचा कर्णधार इशान किसनने या सामन्यात यष्टीमागे तीन झेल तसेच दोन फलंदाजांना यष्टीचित केले. अंकुल रॉयने 37 धावांत 5 गडी बाद केले तर वैभवने 2 बळी मिळवून अंकुलला चांगली साथ दिली.

संक्षिप्त धावफलक: पूर्व विभाग प. डाव सर्वबाद 467, ईशान्य विभाग प. डाव 111, दु. डाव 50 षटकांत सर्वबाद 146 (ज्योतिन सिंग 39, आकाश चौधरी 27, अंकुल रॉय 5-37, वैभव सूर्यवंशी 2 बळी).

Advertisement
Tags :

.