ईस्ट बंगाल महिला फुटबॉल संघ विजेता
वृत्तसंस्था/ चेन्नई
भारतीय फुटबॉल क्षेत्रामध्ये येथे आयोजिलेल्या महिलांच्या लीग फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद ईस्ट बंगाल संघाने पटकाविले. या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात ईस्ट बंगालने विद्यमान विजेत्या ओडिशाचा 1-2 अशा गोल फरकाने निसटता पराभव करत तब्बल 21 वर्षानंतर या संघाने लीग स्पर्धेतील विजेतेपद पटकाविले.
ईस्ट बंगाल आणि ओडिशा यांच्यातील हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. दोन्ही संघांनी आक्रमक आणि वेगवान खेळावर अधिक भर दिला. तसेच दोन्ही संघांच्या बचावफळी भक्कम असल्याने मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच राहिला. सामन्यातील 67 व्या मिनिटाला निर्णायक आणि एकमेव गोल ईस्ट बंगालच्या सौम्या गुगुलोथने नोंदविला. त्यानंतर शेवटच्या 20 मिनिटामध्ये ओडिशाने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. पण ईस्ट बंगालच्या गोलरक्षकाची कामगिरी भक्कम झाल्याने त्यांना शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. देशातील राष्ट्रीय फुटबॉल लीग स्पर्धेमध्ये ईस्ट बंगालच्या पुरुष संघाने 2003-04 साली विजेतेपद मिळविले होते. त्यानंतर या संघाला बाद फेरीपर्यंत मजल मारता आली. ईस्ट बंगालच्या पुरुष संघाने 2003 साली आशिया क्लब चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली होती. ईस्ट बंगाल महिला संघातील सौम्या गुगुलोथ, मॉरीनी एचेंग आणि संध्या रंगनाथन यांची कामगिरी दर्जेदार झाली. ओडिशा संघाने या सामन्यात गोल करण्याच्या किमान तीन संधी गमाविल्या. ईस्ट बंगाल संघाच्या खेळाडूंनी परस्परात योग्य समन्वय राखत पासेस देत ओडिशा संघावर चांगले दडपण आणले होते. नंदिनीने 67 व्या मिनिटाला ओडिशाची बचावफळी भेदत दिलेल्या पासवर सौम्याने या सामन्यातील एकमेव निर्णायक गोल केला.