For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईस्ट बंगाल ‘आयएसएल’चे विजेते

06:37 AM May 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
ईस्ट बंगाल ‘आयएसएल’चे विजेते
Advertisement

22 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात

Advertisement

वृत्तसंस्था  / कोलकाता :

Advertisement

ईस्ट बंगाल एफसी हे पहिल्यांदाच ‘इंडियन सुपर लीग’चे विजेते ठरले आहेत. देशातील या सर्वोच्च दर्जाच्या स्पर्धेत 22 वर्षांपासून विजेतेपदाची वाट पाहत असलेल्या या संघाने अखेर तो दुष्काळ संपवला. विजेतेपदासाठी पाच संघांमध्ये झालेल्या अटीतटीच्या शर्यतीनंतर आपल्या उत्कट चाहत्यांची ‘चषक जिंकण्याची’ तीव्र इच्छा त्यांनी पूर्ण केली.

देशातील सर्वांत यशस्वी आणि नामांकित फुटबॉल क्लबपैकी एक असलेल्या ईस्ट बंगालने किशोर भारती क्रीडांगणावर इंटर काशीवर 2-1 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. दुसरीकडे, मुंबई सिटी एफसी, पंजाब सिटी आणि बेंगळूर एफसी यांच्यासोबत विजेतेपदासाठीचा आणखी एक दावेदार असलेल्या मोहन बागानने युवा भारती क्रीडांगणावर स्पोर्टिंग क्लब दिल्लीला 2-1 ने हरवून पुनरागमन केले. मुंबई एफसीने पंजाब एफसीला 2-0 ने हरवले, तर ओडिशा एफसी आणि जमशेदपूर एफसी यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला.

ईस्ट बंगाल आणि मोहन बागान या दोन्ही संघांनी 13 सामन्यांतून प्रत्येकी 26 गुण मिळवत आपल्या मोहिमेचा समारोप केला. मात्र, ईस्ट बंगालने आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या +13 च्या तुलनेत +19 च्या उत्कृष्ट गोलफरकाच्या जोरावर विजेतेपद पटकावले. या संक्षिप्त स्वरूपातील लीगच्या अंतिम दिवशी झालेल्या नाट्यामय घडामोडींनंतर, स्पर्धेचे माजी विजेते असलेल्या मुंबई सिटी आणि बेंगळूर एफसी यांना अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

तथापि, ईस्ट बंगालला विजयासाठी शेवटच्या मिनिटापर्यंत संघर्ष करावा लागला. कारण 15 व्या मिनिटाला आल्फ्रेडने केलेल्या अप्रतिम ‘फर्स्ट-टाइम फिनिश’ गोलमुळे इंटर काशीने सामन्यात आघाडी घेतली होती. मध्यंतरापूर्वी बरोबरी साधण्याच्या अनेक संधी गमावल्यानंतर ऑस्कर ब्रुझोन यांच्या मार्गदर्शनाखाली कायापालट झालेल्या या संघाने 50 व्या मिनिटाला स्ट्रायकर युसूफ एझेजारीच्या माध्यमातून अत्यंत आवश्यक असलेला बरोबरीचा गोल नोंदवला. युसूफ हा या लीगमध्ये 13 सामन्यांत 11 गोल करत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला असून त्याला ‘गोल्डन बूट’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

73 व्या मिनिटाला मोहम्मद रशिदने ईस्ट बंगालसाठी दुसरा गोल केला आणि कोलकाताच्या या दिग्गज संघाने अत्यंत दिमाखदार शैलीत सामन्याचे चित्रच पालटून टाकले. सुऊवातीला जरी ते काहीसे बचावात्मक पवित्र्यात असले, तरी एकदा आपला सूर गवसल्यावर ईस्ट बंगालने सामन्याच्या मोठ्या कालावधीत चेंडूवर पूर्ण वर्चस्व गाजवले. तसेच निर्णायक आघाडी मिळवण्याच्या उद्देशाने त्यांनी वारंवार आक्रमण केले. त्यांच्या आक्रमक खेळाच्या शैलीमुळे इंटर काशीची बचावफळी विस्कळीत झाली.

यजमान संघाच्या प्रत्येक आक्रमणाला प्रेक्षकांनी प्रचंड जल्लोष करत दाद दिली. मात्र, देशभरात सुरू असलेल्या विजेतेपदाच्या शर्यतीतील इतर सामन्यांचे निकाल जसजसे समजू लागले तसतशी प्रेक्षकांची अस्वस्थता वाढत गेली. मैदानाबाहेरील आर्थिक संकट आणि आयएसएलमधील पदार्पणाचे हे पहिलेच सत्र आव्हानात्मक असूनही इंटर काशीने कौतुकास्पद जिद्द आणि चिकाटीचे प्रदर्शन केले. त्यांच्या खेळाडूंनी अत्यंत धैर्याने बचाव केला आणि प्रतिकूल वातावरण तसेच या महत्त्वाच्या सामन्याच्या दबावाखाली येऊनही त्यांनी सहज हार मानली नाही. सामन्याच्या काही टप्प्यांवर पाहुण्या संघाने ईस्ट बंगालला हतबल केले. ईस्ट बंगालने अखेरचे देशांतर्गत सर्वोच्च लीग विजेतेपद 2003-04 च्या हंगामात तत्कालीन नॅशनल फुटबॉल लीगमध्ये, दिवंगत सुभाष भौमिक यांच्या मार्गदर्शनाखाली पटकावले होते.

Advertisement
Tags :

.