For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हेनेझुएलात पुन्हा भूकंपाचे धक्के

06:53 AM Jun 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
व्हेनेझुएलात पुन्हा भूकंपाचे धक्के
Advertisement

मृतांचा आकडा 1,000 च्या जवळ; हजारो लोक अजूनही बेपत्ता

Advertisement

वृत्तसंस्था/ कराकस

दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला हा देश सध्या या शतकातील सर्वात मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करत आहे. दोन विनाशकारी भूकंपांनी देशभरात हाहाकार माजवला असून, शहरांचे ढिगारे झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी बसलेल्या हादऱ्यांनी लोक अजूनही सावरलेले नसताना शनिवारी सकाळी आणखी एक भूकंप झाल्यामुळे घबराट पसरली. व्हेनेझुएलामध्ये शनिवारी सकाळी 4.9 तीव्रतेचा भूकंप जाणवला. या हादऱ्यांना आधीच्या विनाशकारी भूकंपाचा आफ्टरशॉक (पुनर्धक्का) मानले जात आहे.

Advertisement

स्थानिक अधिकारी आणि मदत संस्थांच्या भूकंपाच्या आपत्तीत आतापर्यंत 920 लोकांचा मृत्यू झाला आहे. जखमींची संख्या 5,000 हून अधिक असल्याचा अंदाज असून, त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. आता सर्वात मोठी चिंता अजूनही बेपत्ता असलेल्या हजारो लोकांची आहे. बेपत्ता असलेल्यांचा आकडा 50 हजारांपर्यंत असून हे लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यामुळे येत्या काही दिवसांत मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊ शकते. अनेक भागांतील परिस्थिती इतकी गंभीर आहे की, लोक आपल्या प्रियजनांना शोधण्यासाठी उघड्या हातांनी ढिगारा बाजूला करत आहेत.

भूकंपानंतरच्या धक्क्यांमुळे संकटात भर

शनिवारी सकाळी झालेल्या 4.9 तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यामुळे बचाव पथकांसमोरही धोका निर्माण झाला आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, या नवीन भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली अंदाजे 55 किलोमीटरवर होता. जरी त्याची तीव्रता मागील भूकंपांपेक्षा कमी असली तरी, आधीच जीर्ण झालेल्या इमारती कोसळण्याचा धोका वाढला आहे. लोक आता आपल्या घरी परतण्यास घाबरत आहेत. साहजिकच त्यांना उघड्या आकाशाखाली रात्र काढावी लागत आहे.

भारतीय पथक बचावकार्यात सहभागी

व्हेनेझुएलाच्या या कठीण काळात भारताने आपल्या मैत्रीचे नाते जपत मानवतावादी मदतीसाठी ‘ऑपरेशन अमिस्ताद’ सुरू केले आहे. भारतीय लष्कराच्या 60 पॅरा फील्ड हॉस्पिटलमधील 41 सदस्यांचे एक विशेष वैद्यकीय पथक भारतीय हवाई दलाच्या दोन विमानांमधून व्हेनेझुएलासाठी रवाना झाले आहे. या संघात नऊ अनुभवी लष्करी डॉक्टरांचा समावेश आहे. आपत्तीग्रस्त भागांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय सेवा, शस्त्रक्रिया आणि आघात व्यवस्थापन पुरवण्याचे काम भारतीय पथक करणार आहे.

Advertisement
Tags :

.