जपानला पुन्हा भूकंपाचा हादरा
वृत्तसंस्था / टोकियो
नववर्षाच्या प्रारंभीच झालेल्या विनाशकारी भूकंपातून नुकताच सावरु लागलेल्या जपानला पुन्हा भूकंपाचा तडाखा बसला आहे. मध्य जपानमध्ये मंगळवारी हा 6.0 रिष्टर क्षमतेचा भूकंप झाला. मागच्या भूकंपापेक्षा याची तीव्रता काहीशी कमी होती. तसेच, नव्या भूकंपानंतर सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
हा भूकंप जपान समुद्राच्या सागरतटापासून आपल्या बाजूला समुद्रात झाला. त्यामुळे त्याची तीव्रता भूमीवर विशेष जाणवली नाही. मात्र, मध्य जपानमधील सागरतटांना तो मोठ्या प्रमाणात जाणवला. यात जीवीत हानी झाल्याचे अद्याप घोषित करण्यात आलेले नाही. तसेच मालमत्तेची हानीही मोठ्या प्रमाणात झालेली नाही. तथापि, सावधगिरीचा इशारा भूकंपप्रवण क्षेत्रात देण्यात आला आहे.
आपत्तीनिवारण अद्यापही सुरु
1 जानेवारीला जपानमध्ये झालेल्या महाभूकंपानंतर करण्यात येत असलेले आपत्तीनिवारणाचे कार्य अद्यापही अनेक स्थानी सुरुच आहे. भूकंपाच्या तीव्रतेच्या मानाने जीवीत हाती आटोक्यात राहिली होती. तथापि, मालमत्ता, घरे, मार्ग आणि इतर आस्थापनांची हानी मोठ्या प्रमाणात झाली होती. तो भूकंप 7.6 रिष्टर क्षमतेचा होता. तसेच त्या भूकंपानंतर जाणवलेल्या अनेक छोट्या धक्क्यांनीही मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली होती. त्यातच नव्या भूकंपाची भर पडली आहे.
भूकंपांची मालिका
नववर्षाच्या प्रारंभापासूनच जपानमध्ये भूकंपांची मालिका सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्वत्र सावधानतता बाळगण्याची सूचना केली आहे. आगामी काळात आणखी भूकंप होण्याची शक्यता गृहित धरुन सज्जता राखण्यात आली आहे. काही भागांमध्ये पूर्व उपाययोजना म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच भूकंपाची शक्यता असणाऱ्या भागांमध्ये आश्रयस्थाने निर्माण करण्यात आली आहेत. नागरीकांनाही स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
1 जानेवारीच्या भूकंपात 280 मृत
1 जानेवारीला झालेल्या भूकंपात एकंदर 280 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्यापैकी इशिकावा या एकाच शहरात 202 व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या होत्या. भूकंपाच्या पहिल्या तडाख्यानंतर जवळपास 180 जणांचा मृत्यू झालेला होता. तर 1 हजारांहून अधिकांना वाचविण्यात यश आले होते.