आसामसह ईशान्य भारतात भूकंप
5.8 रिश्टर स्केल तीव्रता : बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, भूतान, चीनमध्येही धक्के
वृत्तसंस्था/ काठमांडू
आसामसह ईशान्य भारत रविवारी भूकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरला. दुपारी 4.41 वाजता आसाममध्ये 5.8 रिश्टर स्केल इतक्या मध्यम तीव्रतेचा भूकंप झाला. भारतासह बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, भूतान आणि चीनसह अनेक देशांमध्ये याचे धक्के जाणवले. भारतीय हवामानशास्त्र विभागाने याला दुजोरा दिला आहे. या भूकंपामुळे गुवाहाटी आणि आसपासच्या भागात इमारती हादरल्याचे सांगण्यात आले. या हादऱ्यांमुळे भिंतींना तडे गेल्याचेही निदर्शनास आले आहे. तथापि, कोणत्याही ठिकाणी जीवितहानी किंवा मोठ्या नुकसानीचे तात्काळ वृत्त नाही.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र आसाममधील उदलगुरी येथे 5 कि.मी. खोलीवर होते. त्याचे धक्के पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश आणि शेजारील देश भूतानपर्यंत जाणवले. भूकंपानंतर गुवाहाटीमधील लोक घाबरून घराबाहेर पडले. ईशान्येकडील भाग उच्च भूकंपीय क्षेत्रात येत असल्यामुळे तेथे असे भूकंप वारंवार होतात. यापूर्वी 2 सप्टेंबर रोजी आसामच्या सोनितपूर जिल्ह्यात 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप नोंदविण्यात आला होता.
आसाममध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. रविवारी दुपारी आलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोक घाबरले. लोक घरे, दुकाने सोडून रस्त्यावर आणि इतर रिकाम्या जागी धावले. मुख्यत: उदलगुरी जिल्ह्यात मोठे धक्के जाणवले. आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. भूकंपादरम्यान घरातील पंखे, वीज इत्यादी थरथर कापू लागले. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (एनसीएस) आसाममधील उदलगुरी येथे झालेल्या भूकंपाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट देखील केली आहे. या पोस्टमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू उदलगुरीमध्ये जमिनीत 5 कि. मी आत होता, असे नमूद केले आहे.
परिस्थितीवर सरकारचे लक्ष : मुख्यमंत्री
भूकंपानंतरच्या परिस्थितीवर सरकार व प्रशासन लक्ष ठेवून असल्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी स्पष्ट केले आहे. आतापर्यंत कोणतेही मोठे नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आम्ही सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असे ट्विट त्यांनी केले आहे.