For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेशात भूकंप, भारतातही हादरे

06:50 AM Feb 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेशात भूकंप  भारतातही हादरे
Advertisement

5.4 रिश्टर स्केल तीव्रता, काही इमारतींची झाली हानी

Advertisement

वृत्तसंस्था / ढाका, कोलकाता

बांगलादेशला भूकंपाचा धक्का बसला आहे. भूकंपमापन यंत्रावर त्याची तीव्रता 5.4 रिश्टर स्केल इतकी नोंद झाली आहे. या भूकंपाचे पडसाद भारतातही जाणवले असून पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथेही धक्के जाणवले. शुक्रवारी दुपारी साधारणत: दीड वाजता या भूकंपाचे धक्के बसले. पहिल्या मोठ्या धक्क्यानंतर अनेक लहान धक्के बसले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घबराट पसरली होती.

Advertisement

बांगलादेशातील नयाबझार हे स्थान या भूकंपाचे केंद्रस्थान होते. ते भारतातील पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी कोलकाता येथून साधारणत: 100 किलोमीटर अंतरावर आहे. कोलकात्यात साधारणत: 10 सेकंदपर्यंत भूकंपाचे हादरे जाणवले. अनेक लोकांनी यावेळी घरांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, धक्के लवकर थांबल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. काही इमारतींना तडे गेल्याचे दिसून आले. मात्र, भारतात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

सॉल्ट लेकमध्येही हादरे

पश्चिम बंगालचे माहिती तंत्रज्ञान केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सॉल्ट लेक शहरालाही या भूकंपाचे हादरे जाणवले. कोलकाता येथील बहुमजली इमारतींच्या वरच्या मजल्यांना हे धक्के अधिक तीव्रतेने जाणवले. तथापि, या धक्क्यांचा कालावधी अत्यल्प असल्याने आणि नंतर आणखी धक्के न जाणवल्याने थोड्याच वेळात शहराच्या दैनंदिन कामकाजाला प्रारंभ झाला. अनेकांनी सोशल मीडियावर या भूकंपकाळातील त्यांचे अनुभव आणि उडालेली त्रेधातिरपीट यांची माहिती प्रसारित केली. कोलकाता येथील सचिवालय आणि इतर सरकारी कार्यालयांमध्येही काही काळ कर्मचाऱ्यांची त्रेधा उडाली होती. अनेक कर्मचारी काम सोडून कार्यालयाबाहेर पळाल्याचे दिसून आले. निवडणूक अधिकाऱ्यांच्या कामातही या भूकंपामुळे काही काळ व्यत्यय आला. पण नंतर काम सुरळीत करण्यात आले.

राज्य सरकारचीही प्रतिक्रिया

पश्चिम बंगालच्या राज्य सरकारने या भूकंपावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भूकंपात जीवितहानी झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. लोकांनी घाबरुन जाऊ नये पण सावध असावे, अशी सूचना करण्यात आली. या राज्यात येत्या एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक आहे. ती तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. भूकंपाचा निवडणुकीच्या कामकाजावर काहीही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.