For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

म्यानमारमध्ये भूकंपामुळे प्रचंड हानी

06:45 AM Mar 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
म्यानमारमध्ये भूकंपामुळे प्रचंड हानी
Advertisement

उपग्रह प्रतिमांमध्ये दिसला भयानक विध्वंस : रविवारी पुन्हा 5.1 रिश्टर स्केलचा भूकंप

Advertisement

वृत्तसंस्था/ नायपिडॉ

प्रलयंकारी भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या म्यानमारला रविवारी पुन्हा 5.1 तीव्रतेचा धक्का बसला. हा नैसर्गिक आपत्तीनंतर देशभरात बचावकार्य सुरू आहे. या आपत्तीत जवळपास दोन हजार लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी दोन दिवसात झाली असली तरी हा आकडा दहा हजारांच्यावर पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. देशात अनेक इमारतींची पडझड झाल्यामुळे कित्येक लोक गाडले गेले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी विविध देशांच्या मदत व बचाव पथकांकडून प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement

म्यानमारमधील भूकंपात दहा लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. रविवारी झालेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे किती नुकसान झाले, याबद्दल तात्काळ कोणताही अहवाल आला नाही. कमकुवत दळणवळण व्यवस्था आणि दुर्गम भागात पोहोचण्यात अडचण यामुळे वास्तविक संख्या खूप जास्त असण्याची शक्यता आहे. याचा अर्थ मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. शेजारच्या थायलंडमध्ये किमान 17 जणांचा मृत्यू झाला असून येथे म्यारमारच्या तुलनेत कमी हानी झाली आहे.

रविवारी दुपारी अडीच वाजता म्यानमारमध्ये पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. त्याची तीव्रता 5.1 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. गेल्या तीन दिवसांत पाचपेक्षा जास्त तीव्रतेचे 4 भूकंप झाले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमधील मंडालेच्या उत्तरेस सुमारे 17 मैल (27 किमी) अंतरावर होता. शुक्रवारी सकाळी 11:50 वाजता 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर म्यानमारमध्ये प्रचंड विध्वंस झाला. म्यानमार आणि थायलंडमध्ये 200 वर्षांतील हा सर्वात मोठा भूकंप होता. या भूकंपाचा परिणाम 334 अणुबॉम्बच्या स्फोटाइतका होता.

देशाचा चेहरा-मोहराच बदलला

म्यानमारमधील विध्वंसाचे काही उपग्रह प्रतिमा समोर आल्या आहेत, ज्यामध्ये भूकंपानंतरची परिस्थिती दिसून येते. नायपिडॉ विमानतळावरील कोसळलेला पूल आणि कोसळलेला नियंत्रण टॉवर चित्रांमध्ये दिसत आहे. भूकंपानंतर प्लॅनेट लॅब्सने घेतलेल्या उपग्रह प्रतिमांमधून देशाचा चेहरा-मोहराच बदललेला दिसत आहे. एकेकाळी गजबजलेले आणि सक्रिय असलेले नायपिदाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मंडालेमधील दाट लोकवस्ती असलेल्या घरांचे संपूर्ण ब्लॉक राख आणि ढिगाऱ्यात व्यापले आहे. येथे काही रस्तेच शिल्लक राहिले आहेत. हा भाग एकेकाळी संपूर्ण देशाची जीवनरेखा होता.

मंडालेमध्ये अनेक लोक बेघर

मंडालेच्या 15 लाख लोकांपैकी अनेकांनी शनिवारची रात्र रस्त्यावर झोपूनच घालवली. भूकंपामुळे हे लोक बेघर झाले. येथे विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग आणि पूल यासह देशातील संपूर्ण पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. बऱ्याच संपत्तीचा विध्वंस झाल्यामुळे मानवतावादी मदत पोहोचण्यास विलंब होत आहे. इरावती नदीवरील इनवा पूलही उद्ध्वस्त झाला आहे.

मृतांचा आकडा 10 हजारांपेक्षा जास्त?

भूकंपातील मृतांचा आकडा 10 हजारांपेक्षा जास्त असू शकतो, अशी भीती युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने व्यक्त केली आहे. शनिवारपर्यंत मृतांचा आकडा 1,650 वर पोहोचला आहे, तर 3,500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अजूनही कित्येक लोक बेपत्ता आहेत. दुसरीकडे, थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एक 30 मजली इमारत कोसळली. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपाचे धक्के थायलंड, बांगलादेश, चीन आणि भारतापर्यंत जाणवले.

भारताकडून आणखी 40 टन मदत साहित्य रवाना

भूकंपग्रस्त म्यानमारसाठी भारताने आतापर्यंत तीन खेपांमध्ये मदत साहित्य पाठवले. ‘ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत आयएनएस सातपुडा आणि आयएनएस सावित्री या भारतीय नौदलाच्या जहाजांनी म्यानमारच्या यांगून बंदरात 40 टन मदतसाहित्य पाठवले, असे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी रविवारी सांगितले. याशिवाय, 118 सदस्यांचे फील्ड हॉस्पिटल युनिट गाझियाबादमधून म्यानमारच्या मंडाले शहरात पोहोचले. यापूर्वी, ‘ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत भारताने 15 टन मदत साहित्य पाठवले होते. दोन भारतीय सी-17 लष्करी वाहतूक विमाने शनिवारी रात्री उशिरा नायपिडॉ येथे उतरली. पहिल्या खेपेमध्ये तंबू, स्लीपिंग बॅग, ब्लँकेट, तयार अन्न, पाणी शुद्धीकरण यंत्र, सौर दिवे, जनरेटर सेट आणि मदतीसाठी आवश्यक औषधे यांचा समावेश होता.

भूकंपग्रस्त लोकांचा जगण्यासाठी संघर्ष

रुग्णालयात जखमींचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लोकांना आपत्तीचा सामना करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. देशात वैद्यकीय पुरवठ्याची कमतरता आहे. अन्न आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहेत. याचदरम्यान, भारत, चीन, थायलंड, मलेशिया, सिंगापूर आणि रशिया या शेजारील देशांनी आग्नेय आशियाई देशाला मानवतावादी मदत पुरवली आहे. भारतीय कर्मचारी देशाच्या उत्तरेकडील मंडाले येथे 60 खाटांचे आपत्कालीन उपचार केंद्र स्थापन करण्यासाठी पोहोचले आहेत. चीनने आपले डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय किट आणि जनरेटर साहित्यासह 135 हून अधिक बचाव कर्मचाऱ्यांची टीम पाठवली आहे. चीनने आपत्कालीन मदतीसाठी 13.8 दशलक्ष डॉलर्स देण्याचेही वचन दिले आहे.

Advertisement
Tags :

.