भूकंप होण्यापूर्वी आकाशात सिग्नल पाठविते पृथ्वी
उपग्रहाने टिपली हालचाल
मोठे भूकंप होण्यापूर्वी त्याचे काही संकेत मिळू शकतात का? इराणमध्ये झालेल्या 6 मोठ्या भूकंपांच्या संशोधनात वैज्ञानिकांना एक असा पॅटर्न आढळून आला आहे, जो या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास मदत करू शकतो. या भूकंपांची तीव्रता 6.0-7.3 दरम्यान होती. हे सर्व भूकंप 2014-21 दरम्यान झाले होते. भूकंपाच्या काही महिन्यांपूर्वी जमिनीच्या आत दबाव वाढण्याचे संकेत दिसून आले होते, त्याचदरम्यान पृथ्वीवरील चुंबकीय हालचालही वाढली होती असे अध्ययनात दिसून आले आहे.
या अध्ययनात युरोपीय अंतराळ संस्थेच्या स्वार्म मिशनच्या उपग्रहीय डाटाचा वापर करण्यात आला. वैज्ञानिकांनी भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून सुमारे 300 किलोमीटरच्या कक्षेत झालेल्या चुंबकीय बदलांना पाहिले आहे. मग या बदलांची तुलना त्या भागातील भूकंपीय हालचालीशी करण्यात आली, परंतु याचा अर्थ आता उपग्रह भूकंपाची योग्य तारीख किंवा जागा पूर्वीच सांगू शकतात असा नाही.
6 भूकंपांमध्ये दिसला एकसारखा बदल
या अध्ययनात 6 मोठ्या भूकंपांविषयी अभ्यास करण्यात आला, यात 18 ऑगस्ट 2014 चा 6.2 तीव्रतेचा मुर्मुरी भूकंप, 1 डिसेंबर 2017 चा 6.2 तीव्रतेचा होजेडक भूकंप, 12 नोव्हेंबर 2017 चा 7.3 तीव्रतेचा अजगेलेह भूकंप, 2021 चा 6.4 तीव्रतेचा फिन भूकंप आणि अफगाणिस्तान नजीक आलेला 6.0 तीव्रतेचा सेफिडसांग भूकंप सामील होता.
वैज्ञानिकांना संशोधनात आणखी एक गोष्ट आढळून आली, ज्याला बी-व्हॅल्यू म्हटले जाते. यामुळे कुठल्याही भागात होणाऱ्या छोट्या आणि मोठ्या भूकंपांच्या प्रमाणाचा अंदाज मिळतो. बी-व्हॅल्यू कमी असण्याचा अर्थ प्लेट्सदरम्यान दबाव वाढण्याचा संकेत असु शकतो. अनेक प्रकरणांमध्ये बी-व्हॅल्यू कमी असण्यासाब्sात उपग्रहाकडून मिळालेली चुंबकीय हालचाल वाढताना दिसून आली.
भूकंपाच्या महिन्यांपूर्वी बदल
मुर्मुरी भूकंपाच्या सुमारे 10 दिवसांपूर्वी बी-व्हॅल्यूमध्ये घसरण दिसली, यादरम्यान तिन्ही उपग्रहांनी चुंबकीय बदल टिपले, एका डाटामध्ये भूकंपाच्या सुमारे 64 दिवसांपूर्वी एकाच दिवसात 5 चुंबकीय बदल नोंद झाले. होजेडक भूकंपात हा बदल आणखी स्पष्ट होता. येथे भूकंपाच्या सुमारे 200-100 दिवसांपूर्वी बी-व्हॅल्यू वेगाने कमी झाली. यादरम्यान चुंबकीय हालचालीही अधिक नोंदविल्या गेल्या. म्हणजेच या प्रकरणात भूकंपाच्या सुमारे 3-6 महिन्यांपूर्वीच काही बदल दिसू लागले होते.
भूगर्भातील प्रभाव वर कसा पोहोचतो?
भूगर्भातील खडकांवर दबाव वाढल्यावर त्यात छोट्या भेगा पडू शकतात. यामुळे खडकांमधील उष्णता आणि चुंबकीय गुण बदलू शकतात. भेगांमधून गॅस अन् इतर पदार्थ बाहेर पडू शकतात. या बदलांचा प्रभाव वरील वातावरण आणि आयनमंडळापर्यंत पोहोचू शकतो असे वैज्ञानिकांचे मानणे आहे. आयनमंडळात होणारी प्रत्येक चुंबकीय हालचाल भूकंपामुळे होत नाही. सूर्याच्या हालचाली आणि भू-चुंबकीय वादळ देखील अशाप्रकारचे बदल घडवून आणू शकते. याचमुळे वैज्ञानिकांनी अशा काळातील आकड्यांना वेगळे ठेवले, जेव्हा सूर्य अन् पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या हालचाली अधिक होत्या.
अचूक भविष्यवाणी अद्याप अवघड
वैज्ञानिकांनुसार हे संशोधन केवळ एक संभाव्य संबंध दर्शविते. उपग्रहीय डाटा पाहून भूकंपाची तारीख, ठिकाण किंवा तीव्रता पूर्वीच वर्तविता येऊ शकेल असे म्हणणे सध्या योग्य ठरणार नाही. याकरता विविध देश आणि भागांच्या अधिक भूकंपांच्या डाटांचा अभ्यास करावा लागेल. या 6 मोठ्या भूकंपांपूर्वी जमिनीतील वाढता दबाव आणि वरील चुंबकीय हालचालीदरम्यान एकसारखा पॅटर्न अनेकदा दिसून आला ही या अध्ययनाची खास बाब आहे. पुढील संशोधनातही हीच बाब दिसून आल्यास उपग्रहीय डाटा भूकंपापूर्वी होणाऱ्या बदलांना समजून घेण्यास मदत करू शकते.