भल्या सकाळी चंद्रकांतदादा चिंचणीत
संजयकाकांच्या घरवापशीवर शिक्कामोर्तब
सांगली :
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपवून मुंबईहून सांगलीला येताच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भल्या सकाळी साडेसात वाजता तासगाव तालुक्यातील चिंचणी येथे माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली आणि काकांच्या घरवापशीवर शिक्कामोर्तब झाले.
विधानसभा निवडणुकीत अजितदादा पवार यांच्या आग्रहावरून तासगाव आणि इस्लामपूर ही दोन राष्ट्रवादी जिंकत असलेले विधानसभा मतदार संघ आपल्या उमेदवारांसह भाजपला देऊ केले होते. मात्र हे दोन्ही मतदार संघ जिंकण्यात दादांचा पक्ष अपयशी ठरला. त्यानंतर संजयकाकांनी पुन्हा भाजपमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र वरिष्ठ नेत्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. काका पक्षाच्या कोल्हापूर येथे झालेल्या कार्यकारिणीच्या मेळाव्यास व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र तरीही त्यांना प्रवेशाचा निरोप मिळाला नव्हता.
पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यामार्फत त्यांना पक्षाचा योग्यवेळी संदेश मिळेल असे सांगितले जात होते. दरम्यानच्या काळात अधिवेशन आल्याने त्यावरील चर्चा पूर्णतः थांबली होती. मात्र काकांनी नुकताच दिल्ली दौरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांनी नुकतीच चर्चा केली होती. गेल्या चार दिवसात पक्ष पातळीवर जोरदार हालचाली सुरू होत्या. मात्र गुरुवारी सकाळी मुंबईहून येताच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील सकाळी साडेसात वाजताच आपल्या लवाजम्यासह चिंचणीत काकांच्या निवासस्थानी पोहोचले. काकांचे पुत्र आणि तासगाव कवठे महांकाळ भाजप विधानसभा प्रमुख प्रभाकर पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
- स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी चर्चा
संजयकाका आणि चंद्रकांतदादा यांच्यात चर्चा घडावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संकेत मिळाले होते असे समजते. त्यानुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्था सांगली जिल्हा परिषद, सांगली महापालिका, विविध नगर पालिका निवडणुकीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाली असे समजते. लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काकांचा पुन्हा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात असून येत्या आठवड्यात हा प्रवेश निश्चित होईल असे पक्ष नेत्यांकडून संकेत मिळत आहेत. लवकरच फडणवीस हे जिल्हा दौऱ्यावर येणार असून त्यापूर्वी काका सक्रीय होतील अशी चिन्हे आहेत. तासगाव येथे भेट घेऊन पालकमंत्री तातडीने सांगलीला आढावा बैठकीसाठी रवाना झाले असून त्यानंतर ते कोल्हापुरात निवासस्थानी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी देखील पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील संघटना मजबूत करण्यासाठी चर्चा करणार आहेत.