For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्याच्या ड्रग्ज नेटवर्कवर 'ईगल' पथकाचा प्रहार ! तस्कर माफियाला हैदराबादमध्ये रंगेहात पकडले, गोव्यातील साथीदाराचा शोध सुरु

10:58 AM Sep 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोव्याच्या ड्रग्ज नेटवर्कवर  ईगल  पथकाचा प्रहार   तस्कर माफियाला हैदराबादमध्ये रंगेहात पकडले  गोव्यातील साथीदाराचा शोध सुरु
Advertisement

पणजी: गोव्यातून चालणारे बेकायदेशीर ड्रग्जचे जाळे आता परराज्यातही वेगाने पाय पसरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गोव्यात भाड्याच्या मालमत्तेचा व्यवसाय करणाऱ्या एका २९ वर्षीय तरुणाने मुंबईतून ड्रग्ज खरेदी करून ते हैदराबादमध्ये विकण्याचा आंतरराज्य कट रचला; मात्र तेलंगणाच्या अमलीपदार्थ विरोधी 'ईगल' पथकाने त्याचा हा डाव मियापूर मेट्रो स्टेशन परिसरात उधळून लावला. त्याच्याकडून ९ ग्रॅम वजनाच्या १४ एमडीएमए गोळ्या जप्त करण्यात आल्या असून, या रॅकेटचे थेट धागेदोरे गोव्यातील मुख्य ड्रग्ज पुरवठादाराशी जोडले गेले आहेत.

Advertisement

याबाबत माहिती अशी की, गोवा, मुंबई आणि हैदराबाद या तीन राज्यांमध्ये पसरलेल्या एका मोठ्या आंतरराज्य अमलीपदार्थ (नार्कोटिक्स) पुरवठा साखळीचा तेलंगणा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तेलंगणा राज्याच्या अँटी-नार्कोटिक्स युनिट 'ईगल' पथकाने मियापूर पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने मियापूर मेट्रो स्टेशन परिसरात एक धाडसी कारवाई केली. या कारवाईत एका आंतरराज्य अमलीपदार्थ तस्कराला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे ९ ग्रॅम वजनाच्या १४ एमडीएमए गोळ्या आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. पोलारेड्डी सुरेश गोपी (वय २९, मूळ रा. मिर्यालगुडा, नलगोंडा, सध्या रा. एलबी नगर, हैदराबाद) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तस्कराचे नाव आहे.

पोलिस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित पोलारेड्डी सुरेश गोपी हा जुलै २०२४ मध्ये गोव्यात राहायला आला होता आणि तिथे तो भाड्याच्या मालमत्तेचा व्यवसाय करत होता. गोव्यातील वास्तव्यादरम्यान तो अमलीपदार्थांच्या बेकायदेशीर खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीच्या संपर्कात आला. सुरुवातीला त्याने गोव्यातील 'बाबा' नावाच्या एका मुख्य ड्रग्ज पुरवठादाराकडून अमलीपदार्थ विकत घेण्यास सुरुवात केली आणि आपल्या परिचितांना चढ्या दराने विकण्यास सुरुवात केली.

Advertisement

काही दिवसांपूर्वी हैदराबादमधील दोन ग्राहकांनी सुरेश गोपी याच्याकडे एमडीएमए गोळ्यांची मागणी केली होती. त्यावरुन तो १६ सप्टेंबर रोजी मुंबईला गेला आणि तेथील दानिश आलम अन्सारी नावाच्या तस्कराकडून २२,५०० रुपयांना २९ एमडीएमए गोळ्या खरेदी केल्या. या व्यवहाराचे पैसे त्याने बैंक ट्रान्सफरद्वारे पाठवले होते.

अशी झाली अटक
मुंबईतून २९ गोळ्या खरेदी केल्यानंतर, सुरेश गोपी याने त्यातील १५ गोळ्या मुंबईतच गोव्यातील रहिवासी असलेल्या 'मुन्ना' नावाच्या
एका साथीदाराला विकल्या. उर्वरित १४ गोळ्या घेऊन तो मुंबईतील नेरूळ येथून खासगी ट्रॅव्हल्सच्या बसने हैदराबादला जाण्यासाठी निघाला. तो मियापूर मेट्रो स्टेशन परिसरातून जात असताना, गुप्त माहितीच्या आधारे दबा धरुन बसलेल्या 'ईगल' पथकाने आणि मियापूर पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले.

मुख्य सूत्रधार फरार, तपास सुरू
या गुन्ह्याप्रकरणी मियापूर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जप्त केलेले दोन मोबाईल फोन आणि संशयिताच्या बँक खात्यांचे व्यवहार तपासण्यास सुरुवात केली आहे. या रॅकेटमधील मुख्य संशयित पुरवठादार - गोव्यातील 'बाबा' आणि मुंबईतील दानिश आलम अन्सारी हे दोघे सध्या फरार असून, पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. या कारवाईमुळे गोवा-मुंबई-हैदराबाद ड्रग्ज कॉरिडॉरवर पोलिसांचा मोठा वचक निर्माण झाला आहे.

Advertisement

.