For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विष्णू वाघ ‘स्मृतीग्रंथ’ संकल्प पूर्ततेची आतुरता!

06:15 AM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
विष्णू वाघ ‘स्मृतीग्रंथ’ संकल्प पूर्ततेची आतुरता
Advertisement

प्रतिभावंत गोमंतकीय साहित्यिक व नाटककार स्व. विष्णू सूर्या वाघ यांची साठावी जयंती नुकतीच त्यांच्या महाराष्ट्रातील साहित्यिक मित्र परिवार व सम्राट क्लब माशेलतर्फे गोव्यात साजरी करण्यात आली. ‘विष्णूरुप दर्शन’ या संकल्पनेअंतर्गत ज्येष्ठ कवी व वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली कवी अरुण म्हात्रे यांच्यासह गोवा व महाराष्ट्रातील नामवंत कवींनी विष्णू वाघ यांच्या कवितांबरोबरच स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. वाघ यांच्या तीन पुस्तकांचेही यानिमित्त प्रकाशन करण्यात आले.

Advertisement

विष्णू वाघ यांनी कवितेसह साहित्यातील बहुतेक प्रकार यशस्वीपणे हाताळले. त्यांनी आपल्या हयातीत जेवढे लिखाण केले, त्यापैकी निम्मेही अद्याप प्रकाशित झालेले नाही. येणाऱ्या काळात ते वाचकांसमोर आणतानाच विष्णू वाघ स्मृती पुरस्कार व त्यांच्या नाटकांवर स्पर्धा आयोजित करण्याची घोषणाही या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली. विष्णू वाघ यांच्यावर ‘स्मृतीग्रंथ’ काढण्याचा संकल्प  विशेष लक्षवेधी ठरला. विष्णू वाघांच्या साहित्यिक व अन्य क्षेत्रातील कार्याचे संचित असलेला हा ग्रंथ पुढच्यावर्षी 61 व्या जयंतीदिनी प्रकाशित करण्याची ही योजना म्हणजे खऱ्या अर्थाने ठळक विष्णूऊप दर्शन ठरणार

आहे.

Advertisement

विष्णू वाघ आज हयात असते तर त्यांनी वयाची षष्ठ्याब्दी साजरी केली असती. त्यांना जाऊन आज पाच वर्षे उलटली. तरीही विष्णू वाघ यांची अफाट लोकप्रियता अजूनही कायम आहे. त्यांच्या अकाली जाण्याने गोमंतकीय सांस्कृतिक क्षेत्रातील भरगच्च दालन रिते झाले. गोवा व महाराष्ट्राला जोडणारा सांस्कृतिक दुवा हरवला ही भावना त्यांच्या असंख्य चाहत्यांना नेहमीच सलत राहते. भगवान विष्णूला आपल्या कार्यसिद्धीसाठी विविध अवतार घ्यावे लागले. पण एकाच जीवनात कवी, नाटककार, वक्ता, राजकीय नेता अशा निरनिराळ्या भूमिकेत वावरलेले वाघ हे अगम्य व्यक्तिमत्त्व होते. गोमंतकीय निसर्ग व लोकसंस्कृतीचे गान त्यांनी शब्दांनी फुलविले. येथील मातीचा गंध व ताल छंद असलेली त्यांची ही कवने मनाचा ठाव घेतात व अंगारही पेटवतात. ‘शिरंतरी उसळली रगता धार...निजलेल्या देवा आता दाखय वाट. कटर घंणचे कटर..!’ शब्दांचे असे आसूड त्यातून उमटत. त्यांची ‘सुवांरी’ गोव्याच्या संबंध कानाकोपऱ्यात घुमली तशी उभ्या महाराष्ट्रातही गुंजली. ‘गोव्याच्या सागराला खोली आहे, म्हणूनच इथली माती ओली आहे’. मनाचा ठाव घेणाऱ्या अशा कविता बा. भ. बोरकरानंतर लिहिल्या व गायिल्या त्या वाघांनी. मराठी भाषा व येथील संस्कृतीवर त्यांचे अपार प्रेम. जेव्हा जेव्हा मराठीवर किंवा भूमिपूत्रांवर अन्याय झाला, तेव्हा पहिली डरकाळी फोडली ती वाघांनी. पत्रकार म्हणून त्यांचा बाणेदारपणा वेळोवेळी येथील जनतेने व सत्तेनेही अनुभवला. नाटककार म्हणून त्यांनी रंगभूमीला वेगळी उंची प्राप्त कऊन दिली.

आदित्यचक्षू, तुका अभंग अभंग, शिवगोमंतक, माझ्या मातीचे गायन अर्थात सुवारी ही त्यांची नाटके म्हणजे स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. त्यांच्या नाटकातील नायक विष्णूप्रमाणेंच बंडखोर. पुराण व इतिहासाचा संदर्भ देत ती वास्तावाशी भिडतात. त्यामुळे त्यांची नाटके कालातीत ठरतात. साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात ‘मऊ मेणाहुनी आम्ही विष्णूदास, कठिण वज्रासही भेदू ऐसे’ याच बाणेदार भूमिकेतच ते आजन्म वावरले. त्यामुळे वाघ आणि वाद हे जणू समिकरणच जुळले. त्यांच्या नाटकातील विषय व संवाद जेवढे खळबळजनक तेवढेच तर्कसंगत आहेत. त्यांनी नाटके लिहिली, स्वत: ती दिग्दर्शित केली व त्यात भूमिकाही केल्या. आपल्या जीवंतपणी त्यांनी अनेक वाद झेलले व पेलले. त्यांच्या आजारपणात ‘सुदिरसूक्त’वऊनही वादळ उठले. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर स्वपक्षातील नेतृत्त्वाविरोधात उभे ठाकण्याचे धाडस करणारे विष्णू वाघ हेच होते.

विष्णू वाघ यांचे एकंदरीत जीवनच अफाट होते. कोणत्याही एका ठिकाणी ते फार काळ थांबले नाहीत. जिथे रंगले तिथे काहीवेळ थांबले. साहित्यिक व कलावंत म्हणून ते केवळ अष्टपैलूच नव्हे तर त्याही पलीकडचे होते. जीवनाबद्दल त्यांना विलक्षण जिज्ञासा व प्रत्येक कलेविषयी आस्था व ओढ असल्यानेच ते अवघ्या पंचावन्न वर्षांच्या जीवनप्रवासात अनेक क्षेत्रांमध्ये अफाट लोकप्रियता मिळवू शकले. त्यांचे एकंदरीत विचार व भूमिका त्या त्या वेळी त्यांच्या साहित्यातून उमटल्या आहेत. त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांच्या बदलत्या भूमिका बऱ्याचवेळा त्यांच्या चाहत्यांना पटल्या व ऊचल्या नाहीत. पण त्यांच्या लेखनाने सर्वांनाच भूरळ पाडली, हीच त्यामागील खरी ताकद होती. त्यांच्या कविता, नाटके व अन्य लेखनांमध्ये सहजता असल्याने समाजाचे निखळ मनोरंजन करताना अंर्तमुख करण्याची विलक्षण हातोटी होती.

गोव्यात आज साहित्य निर्मितीची उणिव नाही. पण समाजमनाला भिडणाऱ्या व अंर्तबाह्dया हलवून टाकणाऱ्या दर्जेदार साहित्याची त्रुटी निश्चितच आहे. त्यामुळेच विष्णू वाघांची उणिवता जाणवते.

कवी, नाटककार, पत्रकार, वक्ता, राजकीय नेते ही ज्ञात असलेली विष्णू वाघ यांची त्याही पलीकडे काही ऊपे आहेत. त्यांची ही विष्णूरुपे कशी होती याबद्दल जाणून घेण्यासाठी स्मृतीग्रंथाचे प्रयोजन अधिक संयुक्तिक होईल. विष्णू वाघ यांनी आपले आत्मचरित्र लिहिले असते की नाही, हे आज सांगता येणार नाही.

अकाली ओढवलेल्या मृत्यूने त्यांना कदाचित ही संधी दिली नाही. पण स्मृतीग्रंथातून हे जगासमोर येईल. ज्यांचा अत्यंत जवळून सहवास लाभला, अशा साहित्यिक मित्रपरिवाराकडून हे विष्णूसंचित त्यांच्या असंख्य चाहत्यांना नव्याने जाणून घेता येईल. वाघ यांच्या साहित्य वर्तुळातील मित्र परिवाराने सोडलेल्या या संकल्पाची पूर्तता फलदायी होणे त्यासाठी आवश्यक आहे. त्यासाठीच विष्णू वाघ यांच्या 61 व्या जयंतीदिनाची प्रतिक्षा असंख्य चाहत्यांना मोठ्या आतुरतेने लागून राहणार आहे.

सदानंद सतरकर

Advertisement
Tags :

.