For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रत्येक देशाला मित्र निवडण्याचा अधिकार

07:00 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रत्येक देशाला मित्र निवडण्याचा अधिकार
Advertisement

पंतप्रधान मोदींच्या रशिया दौऱ्यावर अमेरिकेची टिप्पणी : भारताकडून चोख प्रत्युत्तर

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रशिया दौऱ्यावरून अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने केलेल्या टिप्पणीला भारताने प्रत्युत्तर दिले आहे. भारत आणि रशिया यांच्यातील संबंध दीर्घकालीन आहेत. बहुध्रूवीय जगात प्रत्येक देशाकडे पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य असल्याचे भारताच्या विदेश मंत्रालयाने सुनावले आहे. पंतप्रधान मोदी अलिकडेच रशियाच्या अधिकृत दौऱ्यावर गेले होते, ज्यानंतर अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी डोनाल्ड लू यांनी जाहीरपणे निराशा व्यक्त केली होती. तसेच मोदींच्या दौऱ्यामुळे अमेरिका चिंतेत असून भारतासोबत चर्चा करत असल्याचे लू यांनी म्हटले होते. डोनाल्ड लू यांच्या या वक्तव्यानंतर भारतीय विदेश मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. भारताचे रशियासोबत दीर्घकालीन संबंध असून ते परस्परांच्या हितसंबंधांवर आधारित आहेत. सद्यकालीन बहुध्रूवीय जगात सर्व देशांकडे स्वत:च्या पसंतीचे स्वातंत्र्य आहे अणि प्रत्येकाने या वस्तुस्थितीला जाणून घेत त्याचे कौतुक करावे असे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयसवाल यांनी अमेरिकेला उद्देशून म्हटले आहे.

Advertisement

अमेरिकेच्या राजदूताकडूनही आक्षेप

डोनाल्ड लू यांच्यापूर्वी भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनीही पंतप्रधान मोदींच्या रशिया दौऱ्यावर आक्षेप व्यक्त केला होता. संघर्षाच्या काळात रणनीतिक स्वायत्तता यासारखी कुठलीच गोष्ट नसते. भारताला स्वत:ची रणनीतिक स्वायत्तता पसंत असल्याचे मी जाणतो आणि या गोष्टीचा सन्मान देखील करतो. परंतु संकटाच्या क्षणांमध्ये आम्ही परस्परांना जाणण्याची गरज आहे. आम्ही विश्वासू मित्र आणि गरजेच्या काळातील सहकारी आहोत हे आम्हाला समजून घ्यावे लागेल असे गार्सेटी यांनी म्हटले होते.

कॅनडाचा दुटप्पीपणा

कॅनडामध्ये पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना ऑनलाइन धमकी दिल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे भारताला जाहीर धमकी देणारे कॅनडात मोकाट फिरत असून तेथील सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला देत असते. आता ट्रुडो यांना धमकी दिल्यावर त्वरित दोन जणांना अटक करण्या आल्याने कॅनडाचा दुटप्पीपणा उघड झाला. भारतीय विदेश मंत्रालयाचे  प्रवक्ते रणधीर जयसवाल यांनी याविषयी आम्हाला माहिती असून कॅनडात भारतविरोधी घटकांवर कारवाई होईल अशी अपेक्षा असल्याचे म्हटले आहे. कॅनडातील भारतविरोधी घटकांनी वारंवार भारतीय नेते, संस्था, एअरलाइन्स आणि राजनयिकांना धमकी दिली आहे. आम्हाला मिळणाऱ्या धमक्यांप्रकरणीही कारवाई व्हावी अशी आमची इच्छा असल्याचे भारतीय विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.

बांगलादेशातून 6700 विद्यार्थी परतले

बांगलादेशातील स्थितीवर भारत सरकार नजर ठेवून आहे. हिंसेच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 6700 भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले आहेत. बांगलादेशचा शेजारी आणि मित्र असल्याने भारत तेथील स्थिती लवकर सुरळीत होईल अशी अपेक्षा करत असल्याचे जयसवाल यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.