मालवणात उद्या ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान
मालवण (प्रतिनिधी)
मालवण शहरातील सर्वांत मोठे ई-यंत्रण म्हणजेच ई-कचरा जनजागृती आणि संकलन अभियान रविवार दि. २६ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाचा उद्देश पर्यावरण संवर्धन आणि जबाबदारीने ई-कचऱ्याचे व्यवस्थापन याबद्दल जनजागृती करणे हा आहे. युथ बिट्स फॉर क्लायमेट आणि पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित केला आहे.
निवासी सोसायट्या, व्यावसायिक संस्था, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालये आणि कॉर्पोरेट कंपन्या या अभियानात ई-कचरा संकलन केंद्र म्हणून सहभागी होत आहेत. या अभियानासाठी मालवण शहरभरात सुमारे १० संकलन केंद्रे (१.ब्लिंक, इंदिरा कॉम्प्लेक्स, २.स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, ३.डॉ. दिघे यांच्या घरी, ४.शिवाजी वाचन मंदिर भरड मालवण, ५. सोनल चव्हाण, वायरी ६. मातृत्व आधार फौंडेशन दीक्षा लुडबे, ७. आगुस्तीन फर्नांडीस ‘मधलो’ भरड, ८. हॉटेल मालवणी, कोळंब ९. भार्गव खराडे, झालझुल वाडी दांडी ) आणि शहरा बाहेर ३ संकलन केंद्रे (एस. ए. कॉम्पुटर- हडी, हर्षदा कोल्ड्रिंक्स -चिंदर, शेफ किचन- देवबाग आणि डॉ. सुमेधा नाईक- देवली यांच्या घरी) येथे उभारण्यात येणार आहेत. नागरिकांनी त्यांच्या जवळच्या केंद्रांवर ई-कचरा जमा करायचा आहे.
ई-कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि शाश्वत व स्वच्छ भविष्य घडवण्यासाठी या सामूहिक प्रयत्नात सामील व्हावे. ई-कचऱ्याच्या योग्य विल्हेवाटीमुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम कमी करता येतील आणि शाश्वत जीवनशैलीकडे वाटचाल करता येईल. संकलित ई-कचऱ्याचे वर्गीकरण करून पुनर्वापर होऊ शकेल असे लॅपटॉप, संगणक आणि टॅबलेट दुरुस्त करून ग्रामीण भागातील गरजू शाळा अथवा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविले जातील. बाकी सर्व ई-कचरा महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने नोंदणीकृत केलेल्या रिसायकलिंग केंद्रांकडे सोपवला जाईल. नागरिकांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ई-यंत्रण अभियानात सहभागी व्हावे आणि जबाबदारीने कचऱ्याचे व्यवस्थापन तसेच पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, अधिक माहितीसाठी 9423878668 / 8446128508 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले असून जनजागृती आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यामुळे हे अभियान यशस्वी होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.