भारतात ई-पासपोर्ट सुरू
आंतरराष्ट्रीय विमानतळांवर इमिग्रेशन प्रक्रिया आता पूर्वीपेक्षा जलद होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पासपोर्ट सेवांचे आधुनिकीकरण करण्यासाठी भारत सरकारने पासपोर्ट सेवा 2.0 अंतर्गत ई-पासपोर्ट सुरू केले आहेत. जागतिक स्तरावर प्रवास सुरक्षा मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. नागरिकांना आता प्रत्येक नवीन पासपोर्ट अर्ज किंवा नूतनीकरणावर इलेक्ट्रॉनिक चिप्स असलेले स्मार्ट पासपोर्ट दिले जातील. या बदलामुळे संबंधित व्यक्तीची ओळख सुरक्षा सुनिश्चित होण्यासोबतच आंतरराष्ट्रीय प्रवास देखील सुलभ होईल, असा दावा करण्यात आला आहे.
ई-पासपोर्टचे वैशिष्ट्या म्हणजे त्याच्या कव्हरमध्ये एम्बेड केलेले मायक्रोचिप असून प्रवाशाचा डिजिटल फोटो, फिंगरप्रिंट आणि इतर बायोमेट्रिक माहिती असेल. ही चिप जागतिक सुरक्षा मानकांनुसार डिझाईन केलेली असल्यामुळे पासपोर्टमध्ये छेडछाड करणे किंवा बनावट करणे जवळजवळ अशक्य आहे. चिपमधील डेटा त्वरित स्कॅन होणार असल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळांवर इमिग्रेशन प्रक्रिया आता पूर्वीपेक्षा जलद होणार आहे. फसवणूक रोखण्यासाठी आणि प्रवाशांना विश्वासार्ह ओळख प्रदान करण्यासाठी हे नवे तंत्रज्ञान क्रांतिकारी ठरेल असे तज्ञांचे मत आहे.
पासपोर्ट अर्ज शुल्क एकसमान
सामान्य नागरिकांवर कोणताही अतिरिक्त भार पडू नये म्हणून सरकारने ई-पासपोर्ट अर्ज शुल्क समान पातळीवर ठेवले आहे. 36 पानांच्या मानक पुस्तिकेची किंमत 1,500 आहे, तर 60 पानांच्या पुस्तिकेची किंमत 2,000 आहे. तात्काळ सेवा निवडल्यास ही रक्कम 3,500 आणि 4,000 पर्यंत वाढू शकते.
ई-पासपोर्ट सेवेसाठी पात्रतेचे कोणतेही बंधन नाही. कोणताही भारतीय नागरिक ई-पासपोर्ट मिळविण्यासाठी अर्ज करू शकतो. ज्येष्ठ नागरिकांना अपॉइंटमेंटसाठी प्राधान्य राहणार आहे. कोणत्याही व्यक्तीचा सध्याचा पासपोर्ट वैध असेल, तर तो ताबडतोब बदलण्याची आवश्यकता नाही. जुना पासपोर्ट त्याच्या उर्वरित वैधता कालावधीसाठी वैध राहील. जर जुना पासपोर्ट कालबाह्य झाला किंवा हरवला असेल तर नवीन ई-पासपोर्टसाठी अर्ज केल्यास तो प्राप्त होऊ शकेल. नवीन अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जन्म प्रमाणपत्र यासारख्या मूलभूत कागदपत्रांची आवश्यकता असेल. तथापि, अर्जदाराचा गंभीर गुन्हेगारी रेकॉर्ड नसावा, अन्यथा अर्ज नाकारला जाऊ शकतो. अर्ज ज्assज्दूग्ह्ग्a.gदन्.ग्ह या ऑनलाईन पोर्टलद्वारे करता येणार आहेत.