रेशनकार्डधारकांच्या ई-केवायसीचे काम स्थगित
1 सप्टेंबरपासून पुन्हा सुरु होणार ई-केवायसी
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
रेशनकार्डवरील ज्या सदस्यांनी 5 वर्षांपूर्वी ई-केवायसी केली होती, त्यांची पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याचे काम अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून हाती घेण्यात आले आहे. त्यातच केंद्र सरकारच्या कोट्यातून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील रेशन याच महिन्यात दिले जात असल्याने यासाठी दोनवेळा बायोमेट्रिक द्यावे लागत आहे. त्यामुळे सर्व्हर समस्या उद्भवत असल्याने बुधवार दि. 19 पासून ई-केवायसी करणे स्थगित करण्यात आले आहे. 1 सप्टेंबरपासून पुन्हा ई-केवायसी करण्याचे काम सुरु केले जाणार आहे.
दर पाच वर्षांतून एकदा रेशनकार्डवरील सदस्यांची ई-केवायसी केली जात आहे. मयत आणि बोगस लाभार्थ्यांना वगळण्यासाठी ई-केवायसी केली जात आहे. जिल्ह्यातील सुमारे 22 लाखाहून अधिक सदस्यांची ई-केवायसी करणे जरुरीचे आहे. उपलब्ध माहितीनुसार 11 लाखाहून अधिकजणांच्या ई-केवायसीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र केंद्र सरकारच्या कोट्यातील अंत्योदय आणि बीपीएल रेशनकार्डधारकांना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील रेशन याच महिन्यात दिले जात आहे. यासाठी दोनवेळा बायोमेट्रिक देणे बंधनकारक आहे. यामुळे सर्व्हर समस्या निर्माण होत असल्याने अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून बुधवारपासून ई-केवायसी करण्याचे काम स्थगित करण्यात आले आहे. 1 सप्टेंबरपासून पुन्हा ई-केवायसीचे काम हाती घेतले जाणार असून रेशनकार्डधारकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.