ई-पीक पाहणी म्हणजे 'घरचे झाले थोडे...' पीक पाहणीसाठी सहाय्यकांची नियुक्ती, पण अद्याप नोंदणी सुरू नाही
चंद्रशेखर देसाई
कणकवली (सिंधुदुर्ग): मराठीत एक म्हण प्रसिद्ध आहे, ती म्हणजे 'घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे' म्हणजेच अगोदरच्या संकटात आणखी भर....! याचा पुरेपुर प्रत्यय शासनाच्या शेतकऱ्यांसाठीच्या 'ई-पीक पाहणी च्या माध्यमातून येत आहे. मुळात अगोदरच ई-पीक पाहणीतील अडचणीत आता आणखी भर पडली आहे. केंद्र शासनाच्या DCS मोबाईल अॅपद्वारे पिकांच्या नोंदवहीत नोंदी करण्याची सुधारित प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी पीक पाहणी सहाय्यकांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. मात्र, ही नोंदणी सुरू झाली असून इतर कामांत व्यस्त असलेले बहुतांश सहाय्यक ही ई-पीक पाहणी कधी करणार, असा सवाल केला जात आहे. त्यामुळे या ई-पीक पाहणीत पहिले पंधरा दिवस तरी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
गतवर्षीपर्यंत ही ई-पीक पाहणी निर्धारित ४५ दिवसांपर्यंत शेतकऱ्यांकडून होत होती. गतवर्षीही त्यासाठी पीक क्षेत्रात २० मीटर अंतरावरून फोटो अपलोड केल्याशिवाय कार्यवाही होत नव्हती. नंतर ४८ तासांत या नोंदी सातबारावर येत होत्या. मात्र, आता पीक पाहणी सहाय्यकाने शेतात पाहणी करून केंद्र शासनाच्या DCS MH मोबाईल अॅपमध्ये शासनाने विहीत केलेल्या पद्धतीनुसार पिकांची नोंद करणे आवश्यक आहे.
यावर्षीपासून पीक पाहणी सहाय्यकांची नियुक्ती
या पीक पाहणी सहाय्यकांची नियुक्ती संबंधित तहसीलदारांनी करायची आहे. प्रत्येक १००० ते १५०० ओनर्स प्लॉटसाठी किमान एका पीक पाहणी सहाय्यकाची नियुक्ती करणे आवश्यक राहील. पीक पाहणी सहाय्यक म्हणून कोतवाल, ग्राम रोजगारसेवक, आशासेविका, राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) चे कर्मचारी, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) चालक, पोलीस पाटील, ग्रामस्तरावर मानधन तत्वावर कार्यरत इतर विभागांतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. मानधन तत्वावरील कर्मचारी उपलब्ध नसल्यास, MyBharat पोर्टलवर नोंदणीकृत नेहरू युवा स्वयंसेवकांची नियुक्ती करावी, अशा सूचनाही दिलेल्या आहेत.
ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून पडताळणी
संबंधित पीक पाहणी सहाय्यकाने शेताच्या बांधापासून २० मीटरच्या आत उभे राहून शेतातील उभ्या पिकांचे, शेताच्या बांधावरील वृक्षांचे तसेच नोंदविलेल्या कायम पड जमिनीचे अक्षांश (Latitude) व रेखांश (Longitude) यासह जिओ-टॅग केलेली किमान दोन सुस्पष्ट छायाचित्रे केंद्र शासनाच्या 'DCS MH' मोबाईल अॅपच्या माध्यमातून विहीत कार्यपद्धतीनुसार अपलोड करणे आवश्यक राहील. पीक पाहणी सहाय्यकाने अॅपद्वारे नोंदविलेल्या सर्व पीक पाहणी नोंदींची १०० टक्के पडताळणी संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्यामार्फत करण्यात येईल.
पीक पाहणी सहाय्यकाने अॅपद्वारे नोंदविण्यात आलेली पीक पाहणीची माहिती ग्राम महसूल अधिकाऱ्याच्या पडताळणीअंती चुकीची अथवा वस्तुस्थितीशी विसंगत आढळल्यास, संबंधित पीक नोंद रद्द करण्यात येईल. या क्षेत्राची पीक नोंदणी पुन्हा करण्यासाठी ते क्षेत्र 'DCS MH' मोबाईल अॅपमध्ये संबंधित पीक पाहणी सहाय्यकास उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ग्राम महसूल अधिकारी यांनी DCS वेबसाईटद्वारे प्रमाणित केलेली पीक पाहणीची माहिती गाव नमुना नं. १२ वर प्रतिबिंबित झाल्यानंतर, त्या माहितीमध्ये कोणतीही दुरुस्ती वा बदल आवश्यक असल्यास संबंधित शेतकऱ्याला चालू हंगाम संपण्यापूर्वी मंडळ अधिकाऱ्यांकडे DCS वेब प्रणालीद्वारे अर्ज सादर करता येईल.
फळबागांकरिता तीन वर्षांसाठी लागू काजू, आंबा, पेरू, चिकू आदींची वेब अॅपद्वारे एकदा नोंदणी झाल्यानंतर, संबंधित फळबाग शेतात अस्तित्वात असल्याचे गृहित धरून पुढील सलग तीन वर्षे पुनः नोंदणी करणे आवश्यक राहणार नाही. अशा कालावधीत या फळबागेची नोंद नोंदणीच्या वर्षासह पुढील ३ वर्षे स्वयंचलित पद्धतीने गाव नमुना क्रमांक १२ वर प्रतिबिंबित करण्यात येईल. तथापि, या फळबागेमध्ये कोणताही बदल, नष्ट होणे, क्षेत्रात बदल वा इतर फरक झाल्यास संबंधित जमीनधारकाने याबाबत संबंधित सहाय्यकास हंगामाच्या सुरुवातीस अवगत करून द्यावे, असे स्पष्ट केले आहे.