न्यू कॉलेजमध्ये ई कंटेंट डेव्हलपमेंट स्टुडिओचे उद्घाटन
कोल्हापूर :
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधील ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन न्यू कॉलेजमध्ये आधुनिक सोयी सुविधांसह ई-कंटेंट डेव्हलपमेंट स्टुडिओचे उद्घाटन आमदार जयंत आसगावकर यांचे हस्ते करण्यात आले. शिवाजी विद्यापीठाअंतर्गत पारंपरिक महाविद्यालयामध्ये अश्या स्वरूपाच्या स्टुडिओची उभारणी पहिल्यांदाच केली आहे.
आमदार आसगावकर म्हणाले, ई-कंटेंट डेव्हलपमेंट स्टुडिओचा वापर जास्तीत जास्त प्राध्यापकांनी करून दर्जेदार ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून द्यावे. इतर अभ्यास केंद्रामध्ये सुद्धा अश्या स्वरूपाच्या स्टुडिओची उभारणी होण्याची गरज असल्याचे सांगितले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कोल्हापूर विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. कुलकर्णी म्हणाले, या स्टुडिओमधून तयार होणारे ई कंटेंट, मुक्त विद्यापीठाच्या नोकरी करत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरेल. संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील म्हणाले, भविष्यात अश्या प्रकारचे स्टुडिओ ही डिजिटल ज्ञानमंदिरे असतील. याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यासाठी वापर व्हावा, अशी अपेक्षा आहे. या स्टुडिओसाठी आवश्यक निधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र, न्यू कॉलेज, यांच्या निधीमधून उपलब्ध करून दिला. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन डी . जी. किल्लेदार, आजीव सेवक उदय पाटील, प्राचार्य डॉ. व्ही. एम पाटील, शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ टी. एम. चौगले, उपप्राचार्य डॉ. आर. डी. धमकले, प्रबंधक एम. वाय. कांबळे, समन्वयक डॉ. एन. व्ही. पवार आदी उपस्थित होते.