ईकॉमर्स कंपन्या अॅमेझोन, फ्लीपकार्ट देणार कर्ज
नवी दिल्ली
भारतातल्या ई-कॉमर्स कंपन्या अॅमेझोन व फ्लीपकार्ट या आता कर्ज देण्यासाठीही कार्यरत होणार आहेत. या दोन्ही कंपन्या भारतीयांना शॉपिंगचा पुरेपूर अनुभव देत असतात. सदरच्या कंपन्या छोट्या व्यावसायिक व ग्राहकांना कर्ज व वित्तसेवा देऊ शकणार आहेत. ग्राहक डाटा, डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म व आरबीआय यांच्या नव्या नियमावलीनुसार कंपन्या वित्तक्षेत्रात व्यवसाय विस्तारासाठी प्रयत्न करत आहेत. जर का या शॉपिंग कंपन्यांनी योग्य रणनिती आखत वित्तीय व कर्ज योजना राबविली तर त्यांना यश नक्कीच मिळू शकतं, असं जाणकार सांगत आहेत.
अॅमेझोनने अलीकडेच बेंगळूरातील बिगर बँकिंग क्षेत्रातील कंपनी एक्सीओ यांचे अधिग्रहण केले आहे. ही कंपनी ग्राहकांना व छोट्या व्यावसायिकांसाठी कर्ज योजना राबवणार आहे. छोट्या व्यावसायिकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार कर्ज पुरवणे हे काम कंपनीचे असेल. एवढंच नाही तर अॅमेझोनने अॅमेझोन पेच्या माध्यमातून स्थानिक बँकांसोबत हातमिळवणी करत फिक्सड डिपॉझीट सुविधा सुरु केली आहे.
फ्लीपकार्टची योजना
वॉलमार्टच्या मालकीची कंपनी फ्लीपकार्ट इच्छुकांना कर्ज पुरवणार आहे. बाय नाऊ पे लेटर व कर्ज सुविधा सुरु करणार आहे. 3 ते 24 महिन्यांच्या बिनव्याजाची ईएमआय योजना व महागड्या उत्पादनांना 18 ते 26 टक्के वार्षिक व्याजाची कर्जाची योजना बनवली जात आहे.