ई- बसचे भूत प्रवाशांच्या माथी! सातारा स्वारगेटमध्ये तिकीट दर सुद्धा दुप्पट
12 मीटरच्या बसऐवजी 9 मीटरची बस, साताऱ्यात 16 तर वाईला 2 बसेस सेवेत रुजू
सातारा प्रतिनिधी
पर्यावरणाच्या नावाच्या आडून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये खासगी बसेसचे डाव सुरु असून ई बसेसचे भूत सर्वसामान्य प्रवाशांच्या माथी मारले आहे. या ई बसमुळे तब्बल 90 रुपयांची भाडेवाढ होत असल्याने सर्वसामान्य प्रवाशी आणि वाहकांत वाद होत आहेत. सातारा स्वारगेट प्रवाशी संघटनेने तर या ई बस नकोच अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, ई बसमध्ये खासगी कंपनीने फसवणूक केली आहे. 12 मीटरच्या बसऐवजी 9 मीटरची बस सेवेत दिली असून सातारा विभागात सातारा आगाराकडे 16 बसेस सेवेत आहेत. त्यातील दोन बसेस या वाईकडे सुपूर्द केल्या आहेत. त्यामुळे तीव्र संताप प्रवाशीवर्गातून व्यक्त होत आहे.
आधीच सातारा विभागात सर्वच अकरा आगारात बसेसचा तुटवडा आहे. प्रवाशांची संख्या जास्त असून त्या प्रमाणात बसेस नाहीत. नव्या साध्या बसेसची मागणी होत असताना ई बसेस सेवेत दाखल झाल्या आहेत. सातारा ते स्वारगेट या मार्गावर दररोज 500 ते 600 प्रवाशी प्रवास करतात. ई बस आल्याने साध्या बसेस बंद करुन त्या लावण्यात येतात. ई बसला तिकीट दरवाढ झाली असून पुरुष प्रवाशी 80 रुपये व महिला प्रवाशी 60 रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यात बसच्या सिटची संख्या कमी असल्याने व सिटमधील अंतर कमी असल्याने गैरसोयीचे बनू लागले आहे. 180 किलोमीटरचे अंतर धावते त्यामुळे एकाच फेरीनंतर या बसला चार्जिंग करावे लागते. त्याकरता दीड तास जातो. त्यामुळे वेळेचे नियोजन कोलमडत आहे. त्यामुळे या बसेसला प्रवाशांमधून तीव्र विरोध होत आहे.
अशी आहे फसवणूक
ई बस ही 12 मीटरची दाखवली गेली आणि प्रत्यक्षात 9 मीटरची बस साताऱ्यात सेवेत हजर करण्यात आली आहे. त्यामध्ये केवळ 35 सिट आहेत. तर साध्या बसेसमध्ये 45 प्रवाशी बसू शकतात. 9 मीटरची बस देवून निव्वळ सातारकरांची फसवणूक केली असून प्रवाशांच्या खिशाला कात्री लावली आहे. त्यामुळे जनक्षोभ आहे. सातारा स्वारगेट प्रवाशी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत गायकवाड, उपाध्यक्ष प्रवीण जमदाडे, सचिव मोहन चिकणे, खजिनदार सोमेश बागल आदींनी निवेदन देवून मागणी केली आहे.
वाईतील प्रवाशांनाही भुर्दड
वाई ते स्वारगेट या मार्गावरही ही बस सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे वाईतल्या प्रवाशांनाही भुईंड सहन करावा लागत आहे. पर्यायाने ही बस नको म्हणून वाईकरही आता पुढे येण्याची शक्यता आहे.