आजपासून गतीशील कारभार सुरु
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा : विरोधकांना ईव्हीएमवरुन टोला
नागपूर : प्रतिनीधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 3.0 सरकारचा हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विस्तार झाला. नवीन 39 मंत्र्यांचा शपथविधी देखील पार पडला. विस्तारित मंत्रिमंडळाची पहिली बैठक देखील झाली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची पहिली पत्रकार परिषद झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे सरकार आजपासून गतीशील कारभार करणार आहे. तसेच येत्या काळात राज्याला प्रगतीपथावर नेण्यास मोठी मदत होणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस आणि मी 200 आमदार जिंकून आणण्याचे आव्हान ठेवले होते. आम्हाला लँड स्लाईड मँडेट मिळाले. 237 जागा मिळाल्या. जास्तीच्या 37 जागा या अजित दादांमुळे मिळालेला बोनस आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात एक टीम म्हणून काम करणार. मॅच तीच आहे, विरोधक तेच आहेत, फक्त मॅच नवीन असल्याचे ते म्हणाले.
त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार : एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यावर एकनाथ शिंदेंनी स्वत: खुलासा करत म्हटले की, आता नाराज कसे होतात आणि खुश कसं दिसायचं हे तुम्हीच सांगा, असं देखील ते म्हणाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्याचा उल्लेख करत एकनाथ शिंदे म्हणाले की, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मला पूर्ण साथ दिली होती. आता मी देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. आम्ही एक टीम म्हणून यापुढे सोबत राहणार. लोकाभिमुख सरकार , देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले
येत्या दोन-तीन दिवसांमध्ये खाते वाटप : उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्यात प्रचंड बहुमताने युतीचे सरकार आले. यानंतर, मंत्रिमंडळाच्या शपथविधीने त्याला खऱ्या अर्थाने अंतिम स्वरूप प्राप्त झाले आहे. दोन-तीन दिवसात मुख्यमंत्री महोदय सर्वांचे खातेवाटप करतील आणि कामाला गती आल्याचे हे आपण सर्वांना बघायला मिळेल. तसेच, आमचा प्रयत्न आहे की, एवढे मोठे बहुमत असल्यामुळे जनतेने महायुतीवर जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला पात्र राहून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कशा प्रकारे करता येईल? हाच प्रयत्न आम्ही सर्व करणार आहोत, असेही अजित पवार म्हणाले.
आघाडीचा चहापानावर बहिष्कार
ईव्हीएम‘च्या बळावर सत्तेत आलेले राज्यातील सरकार दलित आणि शेतकरीविरोधी आहे. परभणी येथे पोलीस बळाचा वापर करून आंदोलकांवर अत्याचार सुरू आहे. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताबाहेर गेली असून सरकारचे आरोपींना पाठबळ असल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला.