ड्वेन ब्रॅव्हो क्रिकेटमधून निवृत्त
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विंडीज संघातील अष्टपैलु ड्वेन ब्रॅव्होने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली असून तो आता आयपीएल विजेत्या कोलकत्ता नाईट रायडर्स संघात मेंटर म्हणून दाखल होत आहे.
2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कोलकत्ता नाईट रायडर्सने विजेतेपद पटकाविले होते. पण त्यानंतर गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. दरम्यान गंभीरच्या जागी 40 वर्षीय ड्वेन ब्रॅव्होची मेंटर म्हणून निवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी दुखापतीमुळे ड्वेन ब्रॅव्हो कॅरेबियन प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेत सर्व सामने खेळू शकला नाही. विश्वचषक जिंकणाऱ्या विंडीज संघामध्ये ड्वेन ब्रॅव्होचा समावेश होता.
आपल्या 21 वर्षांच्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत ड्वेन ब्रॅव्होने सातत्याने दर्जेदार कामगिरी करत विंडीजला अनेक सामने जिंकून दिले. 2021 साली ब्रॅव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली होती. त्यानंतर तो गेल्या वर्षीपर्यंत आयपीएल स्पर्धेशी निगडीत होता. चेन्नई सुपरकिग्ज आणि अफगाण संघाला ड्वेन ब्रॅव्होचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. मला आणखी काही दिवस क्रिकेट क्षेत्रात खेळावयाचे होते. पण प्रकृती साथ देत नसल्याने आपण निवृत्तीचा निर्णय योग्यवेळी घेतल्याचे ब्रॅव्होने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
ब्रॅव्होने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 582 टी-20 सामन्यात गोलंदाजीत 631 बळी घेतले असून फलंदाजीत त्याने जवळपास 7 हजार धावा नोंदविल्या आहेत. यापुढे आपण प्रशिक्षक क्षेत्रात प्रवेश करणार असल्याचे ब्रॅव्होने म्हटले आहे.