For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

श्रीकृष्णाच्या वियोगाने द्वारका दु:खात बुडाली

06:41 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रीकृष्णाच्या वियोगाने द्वारका दु खात बुडाली

अध्याय एकतिसावा

Advertisement

शुकमुनी म्हणाले, श्रीकृष्णांचा सारथी दारूक दु:खीकष्टी अंत:करणाने श्रीकृष्णांच्या वियोगाचे वृत्त सांगण्यासाठी द्वारकेला गेला. श्रीकृष्ण तेथे नसल्याने त्याला द्वारका म्हणजे प्राण गेलेले प्रेत वाटले. अशा ह्या अनाथ, कळाहीन द्वारकेमधील राजभवनात दारुकाने प्रवेश केला. श्रीकृष्णाचे वडील वसुदेव आणि आजोबा उग्रसेन ह्यांच्याकडे बघून त्याच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. तो ढसढसा रडू लागला. त्याला खूप काही सांगायचं होतं पण त्याच्या तोंडून एक शब्द फुटायला तयार नव्हता. दारुकाची ही अवस्था बघून द्वारकेतील सर्व प्रजाजन अतिव्याकुळ झाले. स्फुंदत स्फुंदत दारुकाने कृष्णवियोगाची वार्ता त्या सर्वांच्या कानावर घातली आणि तो बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला शुद्धीवर आणल्यावर वसुदेव आणि उग्रसेनाला त्याने सविस्तर वृत्तांत कथन केला.

तो म्हणाला, सर्व यादवांनी प्रभास येथे जाऊन विधानाप्रमाणे तीर्थविधी केला, ब्राह्मणांना दान दिले, भोजन दिले आणि स्वत: मद्यपानाला सुरवात केली. सर्वांना मद्याचा उन्माद चढला. तसं बघायला गेलं तर ते सर्वजण एकाच गोत्रातील असल्याने कुठून ना कुठून तरी ते एकमेकांचे भाऊबंद लागत होते. पण दारूची नशा चढल्याने ते कुठल्यातरी कारणाने एकमेकांशी वाद घालू लागले. शब्दाने शब्द वाढत गेला आणि शेवटी गोष्ट हमरीतुमरीवर आली. सर्वांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले. ते सर्वजण शूरवीर असल्याने एकमेकांशी प्राणपणाने लढू लागले परंतु तुल्यबळ असल्याने कुणीच कुणाला मारू शकले नाहीत पण जे शस्त्राने साध्य झाले नाही ते एका मुसळाने करून दाखवले.

Advertisement

अशा तऱ्हेने सर्व यादवांनी एकमेकांचा नाश केला. नंतर बळिभद्राने देहाचा त्याग केला. त्यानंतर श्रीकृष्णही निजधामाला गेला. हा सर्व वृत्तांत तुम्हाला कथन करण्यासाठी त्याने मला द्वारकेला जाण्याची आज्ञा दिली. त्याने पुढे असे सांगितले आहे की, इथे एक क्षणभरही न राहता तुम्ही सर्वजण अर्जुनासमवेत पळा. श्रीकृष्णनाथांनी द्वारकानगरी वसवण्यासाठी समुद्राकडून जागा मागून घेतली होती. स्वत: श्रीकृष्ण जागा मागतायत म्हंटल्यावर सागराचा नाईलाज झाला आणि मागे हटून त्याने श्रीकृष्णांना जमीन उपलब्ध करून दिली परंतु आता श्रीकृष्ण येथे नाहीत म्हंटल्यावर समुद्र पुढे येऊन त्याची जमीन पुन्हा ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन तुम्ही सर्वांनी येथून त्वरित निघावे असा निरोप श्रीकृष्णाने तुम्हाला दिला आहे.

Advertisement

श्रीकृष्णाचे निधन झाले आहे ही गोष्ट दारुकाने सांगितल्यावर द्वारकेत एकच बोंब उठली. उग्रसेन कपाळ पिटून घेऊ लागला, वसुदेव डोके आपटून घेऊ लागला, प्रजाजन निरनिराळ्या पद्धतीने दु:ख व्यक्त करू लागले. एक दोन्ही हात कुस्करु लागला तर एक चरफडू लागला, एकाने एकच आक्रोश मांडला तर एक मूर्च्छित झाला.

एकाचा रडून रडून गळा सुकला तर एकाचे ओठ फुटले. सर्वांना अचाट दु:ख झाले. कुणी ओक्साबोक्शी रडू लागले, तर कुणी केस उपटून घेऊ लागले. कुणी हृदय बडवून घेऊ लागले. कुणी दु:खाने वेडेपिसे झाले. कुणी कुणी ‘कृष्णा अरे कृष्णा’ अशा हाका मारू लागले. कुणी तोंडावर पडून रडू लागले तर कुणी पाण्यातून बाहेर काढलेल्या माशाप्रमाणे तडफडू लागले. सर्व स्त्राrपुरुष बोंबलत सुटले आणि शंख करत घरोघरी पोहोचले. कुणी कुणाचे सांत्वन करायचे हाच प्रश्न होता कारण सर्वांनाच अत्यंत दु:ख झाले होते. देवकी आणि रोहिणी मूर्छित होऊन जमिनीवर पडल्या. थोड्यावेळाने दोघी एकदमच शुद्धीवर आल्या आणि त्यांनी एकच आकांत मांडला. कृष्णा तू आमचा विसावा आहेस असा कसा आम्हाला सोडून गेलास लवकर परत ये. तू आमच्यावर रुसला आहेस का असे त्या वारंवार म्हणू लागल्या.

क्रमश:

Advertisement
Tags :
×

.