‘हॅपिनेस इंडेक्स’ वाढवण्याचे कर्तव्य
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : 39 वा गोवा राज्य दिन शानदारपणे साजरा,अनेकांना पुरस्कार, सन्मान, नियुक्तीपत्रे पदान
पणजी : गेल्या 50 वर्षात झाला नाही एवढा विकास गत दहा वर्षांच्या काळात झाला असून वारशाचे विकासात परिवर्तन करण्याच्या या प्रक्रियेत सर्व सरकारे तसेच नागरिकांचाही सहभाग आहे. त्यामुळेच आज गोवा हे उल्हासित राज्य बनले असून यापुढे जनतेचा ‘हॅपिनेस इंडेक्स’ वाढता ठेवणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. राज्याच्या 39व्या राज्य दिनानिमित्त शुक्रवारी पणजीत कला अकादमीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, मंत्री रोहन खंवटे, मंत्री बाबुश मोन्सेरात आदी मान्यवर उपस्थित होते. त्याशिवाय अन्य उपस्थितांमध्ये अन्य मंत्री, आमदार, खात्यांचे सचिव, संचालक, अधिकारी यांची मोठी उपस्थिती होती.
केंद्राचे 80 टक्के उपक्रम पूर्णत्वास
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी डबल इंजिन सरकारमुळे गोव्यात दुहेरी गतीने विकासकामे होत असून यात केंद्र सरकारचेही मोठे योगदान असल्याचे नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सहकार्यामुळे पेडणेपासून काणकोणपर्यंत पायाभूत सुविधा निर्माण करू शकलो. यामुळेच सर्व बाबतीत गोवा देशातील आघाडीचे राज्य ठरले आहे. केंद्र सरकारच्या 13 फ्लॅगशिप उपक्रमांपैकी 80 टक्के उपक्रम आम्ही पूर्णत्वास नेले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोवा म्हणजे सन, सँड, सी, स्पिरीच्युअलिटी
श्रीपरशुराम भूमीचा आत्मा म्हणजे शौर्य, संस्कृती आणि प्रगतीची प्रेरणा. गोव्याच्या मुक्तीपासून ते घटकराज्य दर्जापर्यंतचा प्रवास हा दृढनिश्चय आणि अभिमानाचा आहे. म्हणूनच यापुढे गोव्याची ओळख केवळ सन, सँड आणि सी एवढ्यापुरतीच मर्यादित न ठेवता त्यात आणखी एका ‘एस’ ची भर घालण्यात आली असून हा एस म्हणजे ‘स्पिरीच्युअलिटी’ (आध्यात्म) अर्थात ‘मंदिर पर्यटन’ क्षेत्राची जोड देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पुरस्कार, गौरव, नियुक्तीपत्रे, प्रकाशने
याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘राजभाषा पुरस्कार’, ’आयकॉनिक ब्रँड ऑफ गोवा’, आदी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर स्वातंत्र्य सैनिकांची 16 मुले आणि अनुकंपा तत्त्वावरील 31 उमेदवारांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे देण्यात आली. स्वंयपूर्ण मित्रांचा सन्मान, आदर्श विविध खात्यांचा बहुमान करण्यात आला. तसेच ‘गोव्यातील मंदिरे’, ‘गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर’, ‘विकास पथ’, आदी पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
सहाजणांना राजभाष पुरस्कार प्रदान
वर्ष 2023 ते 25 या तीन वर्षांसाठीचे राजभाषा पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांमध्ये माणिकराव गावणेकर, सुरेश पै, भिकू नाईक, शंभू भाऊ बांदेकर, अनिल सामंत, रमेश वंसकर यांचा समावेश होता. यंदा ‘संस्कृत साहित्य’ प्रकारात कुणाचाही अर्ज आला नसल्याने तो पुरस्कार देण्यात आला नाही.
प्रथमच ‘आयकॉनिक ब्रँड ऑफ गोवा’
‘आयकॉनिक ब्रँड ऑफ गोवा’ पुरस्कार मिळविणाऱ्यांमध्ये लोटलीतील बीग फूटचे महेंद्र आल्वारिस, पणजीतील कॉफे तातो चे प्रदीप आणि प्रणव धुरी, डांगी ऑप्टिशियन, मडगावातील गोमंत विद्या निकेतन, मावजो फोटो स्टुडिओ, कार्मो इस्पितळ, डिचोलीतील झांट्यो काजू, पॉल जॉन डिस्टिलरीज, टीटोज रेस्टॉरंट आदींचा समावेश होता. तसेच लुप्त होण्याच्या मार्गावर असलेली कावी कला पुनऊज्जीवित करण्यात महत्वाचे योगदान देणारे आडपई येथील सागर नाईक मुळे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
गोवा 100 टक्के साक्षर राज्य : अवस्थी
केंद्रीय शिक्षण खात्याच्या संयुक्त सचिव अर्चना अवस्थी यांनी, केंद्राच्या ‘उल्हास भारत साक्षरता अभियान’ अंतर्गत गोवा 100 टक्के साक्षर राज्य बनल्याचे जाहीर केले. 2023-24 मध्ये गोव्यातील साक्षरता 93.6 टक्के होती. त्यात वाढ होऊन ती 99.72 टक्क्यांवर पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितले. या यशासाठी गोमंतकीयांचे अभिनंदन करताना अवस्थी यांनी, येथील नागरिकांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्याचा स्वीकार केला हे या यशामागील खरे कारण असल्याचे नमूद केले. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गोव्यासाठी हा क्षण ऐतिहासिक असल्याचे सांगितले व या यशासाठी सर्व गोमंतकीयांचे अभिनंदन केले. शिक्षण क्षेत्रात सातत्याने घेतलेला पुढाकार, नवे तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यामुळे गोव्याने ही उल्लेखनीय कामगिरी केल्याचे ते म्हणाले.
आता लक्ष्य क्षयरोगमुक्त गोव्याचे : मुख्यमंत्री
100 टक्के साक्षरतेचे लक्ष्य गाठून गोव्याने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. आता ’क्षयरोगमुक्त गोवा’ हे आपले पुढील लक्ष्य असेल. त्याची सुऊवात गोव्यातून होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, गोवा हे पहिले क्षयरोगमुक्त राज्य बनविण्याचा आपला संकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.