For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धूलीवंदन

06:53 AM Mar 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
धूलीवंदन
Advertisement

भारताच्या प्रत्येक राज्यात सगळेच सण आनंदाने साजरे केले जातात. एखादा सण सर्वत्र होतोच परंतु साजरं करण्याची पद्धत वेगवेगळी असते. आनंद मात्र एकसारखाच. थंडीला म्हणजेच शिशिर ऋतूला अत्यंत सन्मानाने निरोप देणारा सण म्हणजे होळी. होळीच्या दुसऱ्या दिवशी सुरू होतो त्यालाच आम्ही धुलीवंदन असे म्हणतो. मातीप्रती कृतज्ञ होण्याचा क्षण म्हणून धुलीवंदन. फाल्गुनातल्या कृष्ण प्रतिपदेला आवर्जून साजरा केला जातो. फाल्गुन म्हणजे आनंदाच्या सीमेवर अलगद निखळण्याचा उत्सव.. मातीत मिसळून उसळून येण्याचे क्षण. पुराण काळामध्ये मदनाचा काम दहन महोत्सव असेही याला म्हटलंय. मदनाला जाळल्यानंतर वसंताचं आगमन होत असतंच हे सांगणारा हा सण. महाराष्ट्रात या सणाची मौज मात्र कोकणात जाऊनच घ्यायला हवी. भाताच्या खाचरातून लोण्यासारख्या मातीचा स्पर्श तिथल्या माणसाला जेव्हा मिळतो तेव्हा तो त्याला वर्षभर जगण्याला पुरेसा असतो. सारा रखरखाट, सगळं दु:ख, दारिद्र्या, सहन करतो. धुळवडीच्या दिवशी माती अंग खांद्यावर लिंपून आपणही या मातीचाच एक भाग आहोत असं स्वत:ला बजावत असतो. खरं म्हणजे आम्ही सर्वच जण पंचतत्त्वाने बनलेलो असलो तरी या सगळ्या पंचतत्वाचे मातीशी किंवा धरणीशी जे गुंफलेपण आहे ते मान्य करण्याचा क्षण. आकाश क्षितिजापाशी मातीला वंदन करण्यासाठी रोज झुकलेलं आपण पाहतो. वायूच्या स्पर्शाने माती खुलते, तेजाला आपल्याच हृदयात साठवते आणि पाण्यालाही धरणीचेच किनारे बांधून ठेवतात. या सगळ्या गोष्टी पाहिल्या की धुलीवंदनाच्या दिवसाचं महत्त्व पटते. या साऱ्या ब्रह्मांडाला चराचराला व्यापून उरणारे धुलीकण सगळे गृहमंडलच पेलत असतात. प्रकाशाचे हात धरून प्रकाशाला पृथ्वीवर घेऊन येतात, उर्जेला घेऊन येतात. धूलीकण तो केवढासा! पण काय त्याचे सामर्थ्य? या धूलिकणात कोणतेही बी पडू द्या त्याचं फळणं, फुलण, रंगणं, नष्ट होणं आणि सामावणं किंवा उधळणं हे सगळे गुणधर्म त्या एवढ्याशा कणातून सर्व जगापर्यंत पोहोचतात. वेदांनी सांगितलेलं वचन ‘पिंडी तेच ब्रम्हांडी’ इथे नेमकेपणाने जाणवते. ‘प्रत्येकाचे पाय मातीचेच’ ही म्हण इथूनच बहुतेक सुरू झाली असावी. पावसाच्या पहिल्या सरीबरोबर येणारा सुगंध जेवढा खरा तेवढाच प्रत्येक फुलातून येणारा सुगंध हा मातीचाच असतो तोही तेवढाच खरा.

Advertisement

सौ.अद्वैता उमराणीकर

Advertisement
Advertisement
Tags :

.