कुवारबाव ते जे. के. फाईल्स मार्गावर धुळीचे साम्राज्य
रत्नागिरी :
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असलेल्या कुवारबाव-मिरजोळे रेल्वे स्टेशन फाटा ते टीआरपी ते जे. के. फाईल्स कंपनी-साळवी स्टॉपदरम्यानच्या भागातील रहिवासी आणि प्रवासी प्रचंड धुळीमुळे अगदी मेटाकुटीस आले आहेत. महामार्गाच्या कामामुळे अर्धवट आणि कच्चा स्वरूपाच्या केलेल्या रस्त्यावरील प्रचंड वर्दळीने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात उडणाऱ्या धुळीमुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. संबंधित कंत्राटदार आणि प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही याकडे डोळेझाक केली आहे. जर प्रशासनाने यावर लवकरच कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा आणि रास्ता रोको करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम या भागात वेगाने सुरू आहे. एका बाजूने सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार झाला असला तरी वाहनांची संपूर्ण वाहतूक जुन्या रस्त्यावरून सुरू आहे. अवजड वाहने व महामार्गाच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या यंत्रणांमुळे हा जुना रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. तर अनेक ठिकाणी कच्चा स्वरूपाच्या रस्त्यावरून वाहने जात आहेत. त्यामुळे वाहनांच्या प्रचंड वर्दळीने धुळीचे प्रचंड लोट उठतात. ज्यामुळे संपूर्ण परिसर धुरकट झाला आहे.
या धुळीचा सर्वाधिक फटका रस्त्यालगतच्या निवासी वस्त्या, दुकाने व व्यावसायिकांना बसत आहे. घरात, दुकानात सर्वत्र धुळीचा थर जमा होत असल्याने येथील जीवनमान विस्कळीत झाले आहे. तसेच जे. के. फाईल्स कंपनी परिसर व साळवी स्टॉप या भागातील व्यावसायिक, दुकानदार, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनाही या धुळीचा सामना करावा लागत आहे. विशेष करून दुचाकी वाहनधारकांना या धुळीचा सामना करावा लागत आहे. या महामार्गालगत कुवारबाव, खेडशी या परिसरात काही प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. धुळीच्या साम्राज्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.
- प्रशासनाचे दुर्लक्ष, तीव्र आंदोलनाचा इशारा
या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी दिवसातून किमान ३ ते ४ वेळा रस्त्यावर पाणी मारणे आवश्यक आहे. कुवारबाव व्यापारी संघटनेने याबाबत अनेकवेळा संबंधित कंत्राटदार व प्रशासनाकडे मागणी केली आहे, परंतु त्यांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ठेकेदार साधा पाणी मारण्याचा त्रासही घेत नसल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आहे. प्रदूषण व आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी व्यापारी आणि स्थानिक रहिवाशांनी केली आहे. जर प्रशासनाने यावर लवकरच कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा व रास्ता रोको करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.