दसरा मेळावा हिंदुत्वापासून संविधान रक्षणापर्यंत !
भाजप आणि शिवसेना हे कधी काळी स्वत:ला नैसर्गिक मित्र म्हणायचे, या दोन मित्रांमधील राजकीय संघर्षाला महाराष्ट्राने अनेक टप्प्यांवर अनुभवले आहे. एकेकाळी हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र असलेल्या या राजकीय शक्ती आज परस्परविरोधी भूमिकांमध्ये उभ्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी आव्हान केवळ भाजपवर टीका करण्याचे नाही, तर हिंदुत्वाच्या राजकारणावरील आपला हक्क आणि संविधानाविषयीची आपली बांधिलकी दोन्ही ठामपणे मांडण्याचे आहे.
भाजपविरोधाची धार अधिक तीव्र करत उद्धव ठाकरेंची तोफ दसरा मेळाव्यातून धडाडणार? निवडणूक आयोग आणि त्याच्या भूमिकेभोवती महाराष्ट्राच्या राजकारणात आधीपासूनच वादाची पार्श्वभूमी आहे. शिवसेनेच्या नावावर आणि पक्षचिन्हावरून झालेल्या संघर्षामुळे उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतले आहेत. त्यातच आता ज्ञानेश कुमारांच्या भूमिकेवरही दसरा मेळाव्यातून जोरदार टीका होणार आहे. शिवसेना आणि दसरा मेळावा यांचे अतुट नाते आहे, 30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवाजी पार्क मैदानावर सुरू झालेल्या या मेळाव्याला यंदा 2026 रोजी 60 वर्ष पूर्ण होत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली ही परंपरा त्यांच्यानंतर उध्दव ठाकरे यांनी पुढे सुरू ठेवली तर, शिवसेनेत फुट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या शिवसेना पक्षाची दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवताना यंदा शिंदे यांच्या शिवसेनेचा पाचवा दसरा मेळावा गोरेगाव येथे साजरा होत आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे राजकीय सभा न बघता या मेळाव्यातून बाळासाहेबांनी अनेकदा व्यापक भूमिका मांडली. 1966 मध्ये बाळासाहेबांनी मराठी तऊणांच्या रोजगाराचा आणि मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वाचा मुद्दा समोर आणला. मराठी अस्मितेच्या मुद्यावर शिवसेनेची संघटनात्मक उभारणी झाली. पुढे 1989 च्या दसरा मेळाव्यात त्यांनी काँग्रेसला थेट लक्ष्य करत हिंदुत्वाप्रती आपली भूमिका अधिक स्पष्ट केली. 1991 च्या मेळाव्यात पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट सामन्यांना विरोध करण्याची भूमिका मांडली. गेल्या पाच वर्षापासून शिवसेनेचे दोन दसरा मेळावा होत असून, आता दसरा मेळावा संघटन शक्ती दाखविण्याचे व्यासपीठ झाले आहे.
शिवसेनेत फुट पडल्यानंतर उध्दव ठाकरे यांचा भाजपविरोधी सूर अधिक तीव्र झाला आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर करताना ठाकरे यांच्या खासदारांना फोडल्याने उध्दव ठाकरे सध्या जखमी वाघाच्या भूमिकेत आहेत. दुसरीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होत असताना निवडणूक आयोगाच्या तत्कालीन भूमिकेविषयी वारंवार न्यायालयात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत टीका करण्याची संधी उध्दव ठाकरे सोडणार नाही, ज्ञानेश कुमार यांच्याबाबत इंडिया आघाडीने घेतलेली भूमिका बघता, महाराष्ट्रातून जोरदार विरोध झाला. भाजपपासून वेगळे झाल्यानंतर ठाकरे यांनी भाजपचे हिंदुत्व बेगडी आणि शेंडी जानव्याचे असल्याचे सांगत, दसरा मेळाव्यातून जोरदार टीका केली. जय श्री राम, हाताला नाही काम, गाईवर काय बोलता, महागाईवर बोला असे थेट सवाल ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावऊन भाजपला यापूर्वी केले. मात्र आता हिदुत्वाचा मुद्दा मागे पडून मतचोरी हा महत्त्वाचा मुद्दा देशात गाजत आहे.
देशातील तरूणांनी या मुद्यावऊन रान तापवलेले आहे. नीट पेपर फुटीनंतर तरूणांनी दिल्लीत ‘जंतर मंतर’वर केलेल्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर विरोधकांपेक्षा तरूणांची आंदोलने आणि निषेध मोर्चे गाजू लागले, मग तो एमपीएससी परिक्षेतील भोंगळ कारभार असो किंवा मतचोरीचा विषय असो. मतचोरीच्या विषयावर कॉक्रोच जनता पार्टीसोबत ठाकरे यांची पुढची पिढी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी भाजप आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेला विरोध केला, राजकारणात काळानुसार प्रश्न बदलतात आणि त्यानुसार संघर्षाचे स्वरूपही बदलते. कधी हिंदुत्व तर कधी मराठी भाषेचा मुद्दा घेऊन लढणारी शिवसेना आता संविधानातील मूल्याच्या संरक्षणासाठी लढताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाची एक खासियत आहे. ते केवळ आरोप करत नाहीत, तर आपल्या भाषणातून विरोधकांना राजकीय प्रश्नांच्या कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या भाषणातील उपरोध, खोचक टोले आणि थेट सवाल ही त्यांच्या शैलीची वैशिष्ट्यो आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्यात त्यांच्या ठाकरी भाषेचा तडाखा कोणाला बसणार, याची चर्चा रंगणे स्वाभाविक आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यातून उध्दव ठाकरे यांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेतून शिंदे यांच्या शिवसेनेत अद्यापही इनकमिंग चालूच आहे, दोनच दिवसापूर्वी उबाठाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पेंद्रातील नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतफत्वाखालील भाजपने महाराष्ट्रात आपली राजकीय ताकद वाढवली आहे, दुसरीकडे शिंदेना बळ देताना भाजपने ठाकरे यांचे पूर्ण खच्चीकरण केले आहे. गेल्या वर्षी दसरा मेळाव्यात व्यासपीठावर असणारे खासदार यावर्षी शिंदेंच्या व्यासपीठावर दिसणार आहेत, जे मशाल चिन्हावर निवडून आलेले आहेत. त्यामुळेच ज्या शिवसेनेची दसरा मेळाव्याची पूर्वीची कॅचलाईन ही वाजत गाजत, गुलाल उधळत विचारांचे सोने लुटायला या अशी असायची ती यंदा संविधान रक्षणाची धगधगती मशाल बनुन या ! अशी आहे. ठाकरे दसरा मेळाव्यात महाराष्ट्रातील सत्तासमीकरणे, पेंद्रीय नेतफत्वाचा प्रभाव आणि प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित करू शकतात.
भाजपचे राजकारण म्हणजे केवळ निवडणुका जिंकण्याचे गणित आहे की विरोधकांचे राजकीय अस्तित्व संपवण्याची रणनीती, असा सवाल त्यांच्या भाषणातून उपस्थित होऊ शकतो. ठाकरे यांच्यासाठी हा मेळावा भाजपवर टीका करण्याची संधी असली, तरी त्यापलीकडे स्वत:ची राजकीय दिशा स्पष्ट करण्याची असणार आहे. एकीकडे मुंबईत दोन्ही शिवसेनेचे दसरा मेळावे होत असताना तिकडे नागपूरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत तर भगवान गडावऊन भाजप नेत्या पंकजा मुंडे, तर नारायण गडावऊन मराठा समाजाचे मनोज जरांगे आपली भूमिका मांडणार आहेत. दसरा मेळावे अनेक होतील, नेत्यांची भाषणे देखील गाजतील पण दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविणारी भूमिका कोण मांडणार हे महत्त्वाचे असणार आहे.
प्रवीण काळे
