दसऱ्याचे राजकारण
सोलापूरसह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील अभूतपूर्व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा रद्द करण्याची जोरदार मागणी सध्या भारतीय जनता पक्षाकडून होत आहे. 19 जून 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली. तेव्हापासून सेनेच्या दसरा मेळाव्याची जवळपास साडेपाच दशकांची परंपरा आहे. शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा हे तर समीकरणच मानले जाते. 2006 चा अपवाद वगळता हा मेळावा कधीही खंडीत झाल्याचे उदाहरण सापडत नाही. त्या वर्षी पावसातून झालेल्या चिखलसदृश परिस्थितीमुळे हा मेळावा रहीत करावा लागला होता. तर शिवसेनेतील अभूतपूर्व फुटीनंतर 2022 पासून सेनेचे दोन स्वतंत्र मेळावे होत आहेत. किंबहुना, आता ठाकरे सेनेने मेळावा घेऊ नये, असा आग्रह भाजपचे नेते करताना दिसतात. मेळावा घेण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांना मदत करावी, अशी अपेक्षा मंत्री गिरीश महाजन, पक्ष प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. किंबहुना, त्यामागे उदात्त हेतू किती आणि राजकारण किती, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. खरे तर सेनेने मेळावा घ्यावा वा घेऊ नये, हा त्या पक्षाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तरीही इतरांस शहाणपण शिकविण्याचा संबंधित पक्षाचा वा नेत्यांचा अधिकारही मान्य करायला हवा. तथापि, हाच मुद्दा मित्रपक्ष शिंदे गटाला किंवा पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवकाला आणि भाजपातील विविध गटातटांनाही लागू होतो, याचे भान संबंधितांनी ठेवायला हवे. शिंदे गट आणि त्यांच्या पक्षाचे कल्चर तसे डोळे दीपवणारे. आत्तापर्यंत त्यांच्या पक्षाचे झालेले मेळावे, कार्यक्रमच काय ते खर्चाबद्दल सांगून जातात. या पक्षाचा मेळावा आधी आझाद मैदानावर होणार होता. त्याची जोरदार तयारीही सुरू करण्यात आली होती. परंतु, आता हे ठिकाण बदलण्यात आल्याची घोषणा पक्षाकडून करण्यात आली आहे. हा मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणार असून, या भव्यदिव्य मेळाव्याला सामाजिक बांधिलकीचा मुलामा लावण्याचा निर्णयही पक्षाने घेतला आहे. मराठवाड्यातील पूरस्थितीबाबत आपण किती गंभीर आहोत, हे दाखविण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल. यातून पूरग्रस्तांसाठी मदतनिधी उभारण्यात येणार असून, हा मेळावा शेतकऱ्यांना समर्पित असल्याचे सांगण्यात आले आहे. या माध्यमातून ठाकरे सेनेला कसा शह देता येईल, असाही शिंदे आणि कंपनीचा प्रयत्न असेल. ठाकरे यांच्याकडून अद्याप मेळाव्याचे स्वऊप व रचना याविषयी काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही. पण, खर्च टाळून हा मेळावा रद्द झाला पाहिजे, अशी भाजपाची भूमिका आहे. ठाकरे यांची शिवसेना ही नकली आहे, अशी टीका कालपरवापर्यंत भाजपकडून करण्यात येत होती. तसे असेल, तर या नकली सेनेचा नकली मेळावा गांभीर्याने घेण्याचे कारण काय, असा सवाल उत्पन्न होतो. त्यामुळे एकप्रकारे असा सल्ला देऊन भाजपाने ठाकरे यांच्या शिवसेनेलाच मान्यता दिल्याचे दिसून येते. भाजपा नेत्या पंकजा मुंडे याही दरवर्षी दसरा मेळावा घेतात. सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावरील हा मेळावाही औत्सुक्याचा विषय असेल. मेळाव्याऐवजी या वर्षी मराठवाड्याला मदतीचा हात देण्याकरिता तसेच शेतकऱ्यांना उभे करण्याकरिता योगदान द्यावे, असा सल्ला भाजपला देता आला असता. पण, लोका सांगे ब्रम्हज्ञान, अशीच सध्याची स्थिती आहे. अर्थात मराठवाड्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्यात गूळ, गव्हाचे पीठ, चणाडाळ सोबत आणण्याचे आवाहन मुंडे यांनी केले आहे. त्यांचे हे सामाजिक भान निश्चितच कौतुकास्पद. रा. स्व. संघ ही भाजपची मातृसंस्था. यंदा ही संस्था 100 वर्षांची होत आहे. संघाच्या शंभरीनिमित्त विविध उपक्रमही राबविण्यात येत आहेत. संघ स्वयंसेवकांनी पूरग्रस्त भागात मदत केल्याची छायाचित्रेही ठिकठिकाणी पहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वत: पाण्यात उतरून ज्या पद्धतीचे काम पूरग्रस्त भागात केले, तेही सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे हे दोन्ही घटक प्रशंसेस पात्रच ठरतात. मात्र, पूरस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विजयादशमीचा रा. स्व. संघाचा कार्यक्रमही रद्द करण्यात यावा, अशी मागणी भाजपाकडून झालेली दिसत नाही. संघ, शिंदे, पंकजाताई यांच्याबद्दल एक धोरण आणि ठाकरेंबद्दल दुसरे धोरण असेल, तर त्याला राजकारणाचा वास आल्याशिवाय राहत नाही. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता तोंडावर आली आहे. दिवाळीनंतर ही निवडणूक होईल, असे मानले जाते. या निवडणुकीत भाजपाचा प्रमुख प्रतिस्पर्धी ठाकरेसेनाच असेल. उद्धव ठाकरे व मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र आले, तर ही निवडणूक भाजपाला जड जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे ओळखून पक्षाने जिथे दिसेल, तिथे ठाकरेंना घेरण्याची रणनीती अवलंबली आहे. सेना फुटीनंतर ठाकरेंना राजकीयदृष्ट्या मोठा धक्का बसला, तरी आजही मुंबईत त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे इतकी शक्ती लावूनही लोकसभा व विधानसभेच्या अनेक मतदारसंघात ठाकरेंचा जनाधार दिसून आला. भाजपची हीच पोटदुखी आहे. त्यात शिवसेना आणि शिवसैनिकांसाठी दसरा मेळावा हा नवीन उर्जेप्रमाणे असतो. या दसरा मेळाव्यातून शिवसैनिक लढण्याची ताकद घेऊन जातात. त्यामुळे हा मेळावाच होऊ नये, असे भाजपला वाटत असावे. तथापि, भाजपनेच महाराष्ट्राचे, देशाचे सगळे राजकारण, समाजकारण ठरवावे, असा काही नियम नाही. ज्याला त्याला ज्याचे त्याचे स्वातंत्र्य आहे आणि जो तो आपापला निर्णय घेण्यास समर्थ आहे. मराठवाड्याची आपत्ती निश्चितच मोठी आहे. 1972 चा दुष्काळ, किल्लारीचा भूकंप आणि आत्ताची अतिवृष्टी यातून मराठवाडा मोडून पडला आहे. म्हणूनच मराठवाड्याला सावरण्यासाठी सर्वपक्षीयांनी कोणतेही राजकारण न करता एकत्र यावे. मराठवाड्याला, तेथील जनतेला उभे करण्यासाठी काय करता येईल, याचा निर्णय घ्यावा. राजकारणाऐवजी विजयादशमीच्या मुहूर्तावर हे सीमोल्लंघन झाले, तर सोन्याहून पिवळेच होईल.