शाळांच्या दसरा सुटीत 18 पर्यंत वाढ
सरकारी, अनुदानित शाळांसाठी आदेश : सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत मुदत
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात 22 सप्टेंबरपासून सुरू असलेले सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणाचे (जातनिहाय गणती) काम अद्याप पूर्ण झालेले नाही. ते पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने सरकारी व अनुदानित शाळांची दसरा सुटी 18 ऑक्टोबरपर्यंत वाढविली आहे. 19 ऑक्टोबरपर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. सरकारचा हा आदेश खासगी (विनाअनुदानित) शाळांसाठी लागू नाही. त्यामुळे पूर्वी दिलेल्या आदेशानुसार खासगी शाळा बुधवार दि. 8 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत.
सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षणाचे काम पूर्ण न झाल्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी रात्री अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर शिक्षण खात्याने 8 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत शाळा भरविण्याचे आणि दुपारनंतर सर्वेक्षणाचे काम करण्याचा आदेश दिला होता. मात्र, राज्य सरकारी कर्मचारी संघटना आणि राज्य प्राथमिक शालेय शिक्षक संघटनेने शिक्षणमंत्र्यांना पत्र पाठवून शाळा व सर्वेक्षण असे दुहेरी काम एकाचवेळी केल्याने शिक्षकांवर मोठा ताण पडेल. त्यामुळे दसरा सुटी वाढविण्याची विनंती केली होती. याची दखल घेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी दुपारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन राज्याचा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या सरकारी व अनुदानित शाळांच्या दसरा सुटीत 18 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. सायंकाळी शालेय शिक्षण खात्याच्या आयुक्तांनी यासंबंधीचे अधिकृत पत्रक जारी केले.
22 सप्टेंबरपासून राज्यात सामाजिक, शैक्षणिक सर्वेक्षणाला प्रारंभ झाला. 7 ऑक्टोबरपर्यंत सर्वेक्षणाची मुदत दिली होती. मात्र, काही जिल्ह्यांत सर्वेक्षण पूर्ण झालेले नाही. कोप्पळमध्ये 97 टक्के तर मंगळूर, उडुपी जिल्ह्यांत 63 टक्के सर्वेक्षण झाले आहे. आमच्या अपेक्षेप्रमाणे राज्यभरात सर्वेक्षणाचे काम झालेले नाही. 1.20 लाख शिक्षक व 60 हजार इतर अधिकारी सर्वेक्षणाच्या कामात गुंतले आहेत. शिक्षक संघटनेच्या विनंतीवरून राज्य मागासवर्ग आयोगाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिक्षकांना सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी अनुकूल व्हावे यासाठी सरकारी व अनुदानित शाळांच्या दसरा सुटीत आणखी 8 दिवस वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. 19 ऑक्टोबरपर्यंत सर्वेक्षण पूर्ण झाले पाहिजे, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले.
वाढीव सुटीच्या कालावधीत मुलांच्या अध्ययनात निर्माण झालेली तूट सुटीनंतर भरून काढण्याची सूचनाही देण्यात आली आहे.
पदवीपूर्व महाविद्यालयीन प्राध्यापकांना सूट
बारावी अर्धवार्षिक परीक्षांमध्ये गुंतलेल्या पदवीपूर्व महाविद्यालयीन प्राध्यापकांना सर्वेक्षणाच्या कामातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेंगळूरमध्ये सर्वेक्षण वेगवान होण्यासाठी दिवाळीपूर्वी ते पूर्ण करण्याची सूचना दिली आहे. सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी सरकारने एकंदर 12 दिवसांचा कालावधी वाढवून दिला आहे. सर्वेक्षण कामात सहभागी न होणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 20 लाख रु.
सर्वेक्षणावेळी मृत्यू झालेल्या तीन शिक्षकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 20 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. बागलकोट तालुक्यातील बेडनायकनदिन्नी येथे सर्वेक्षण संपवून घरी परतत असताना दुचाकीवरून पडल्याने रामपूर येथील प्राथमिक शाळेच्या शिक्षिका दानम्मा यडहळ्ळी यांचा मृत्यू झाला होता. चिक्कबळ्ळापूर येथे सर्वेक्षण सुरू असताना रामकृष्णप्पा या शिक्षकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. आणखी एका शिक्षकाचाही हृदयविकाराने निधन झाले होते. या तिघांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 20 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
विनाअनुदानित शाळा आजपासून गजबजणार
राज्य सरकारने राज्यातील विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांवर सामाजिक, शैक्षणिक सर्वेक्षणाचे काम सोपविलेले नाही. त्यामुळे या शाळा पूर्वनियोजनाप्रमाणे दसरा सुटी संपल्याने बुधवार 8 ऑक्टोबरपासून नेहमीप्रमाणे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिणामी विनाअनुदानित शाळा बुधवारपासून पुन्हा सुरू होणार आहेत.
दिवाळीनंतरच विद्यार्थी शाळेत...
18 ऑक्टोबरपर्यंत दसरा सुटीत वाढ करण्यात आली आहे. 19 तारखेला रविवार आहे. तर 21 तारखेपासून तीन दिवस दिवाळी आहे. त्यामुळे 20 तारखेपासून सरकारी व अनुदानित शाळा सुरू होणार असल्या तरी विद्यार्थ्यांची अधिक उपस्थिती दिवाळीनंतरच दिसून येण्याची शक्यता आहे.
सरकारच्या आदेशानुसार सरकारी व अनुदानित शाळांच्या दसरा सुटीत वाढ करण्यात आली आहे. तर विनाअनुदानित शाळा बुधवारपासून त्यांच्या नियमित वेळेनुसार भरणार आहेत. याची शाळा, पालक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
- रवी बजंत्री,
गटशिक्षणाधिकारी, बेळगाव शहर