For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात

06:48 AM Oct 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात
Advertisement

शिंदे गटाकडून अचानक बदल : होणारी गर्दी लक्षात घेऊन नियोजन

Advertisement

प्रतिनिधी/ मुंबई

दसरा मेळाव्याला शिवसेनेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. यावेळी जाहीर सभांपेक्षाही मोठी गर्दी जमा होते. यंदा तर दिवाळीच्या आसपास निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेत यंदा शिवसेनेचा (शिंदे गटाचा) दसरा मेळावा आझाद मैदानात होणार आहे. अगोदर हा मेळावा बीकेसीत घेण्याचे निश्चित झाले होते. मात्र कार्यकर्त्यांची गर्दी आणि वाहतूककोंडी लक्षात घेऊन मेळाव्याच्या ठिकाणात अचानक बदल करण्यात आला आहे.

Advertisement

आझाद मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या (शिंदे गटाच्या) दसरा मेळाव्यासाठी भव्य असे व्यासपीठ उभारण्याचे काम सुरू आहे. विधानसभा निवडणूक असल्यामुळे दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनेकडून यंदा भव्य शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. 50 हजार लोक बसतील इतक्या खुर्च्या सध्या आझाद मैदानामध्ये आणलेल्या आहेत.

दसरा सण म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवस मानला जातो. शिवसेना एकसंध असताना विचारांचे सोने लुटण्याची परंपरा बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली. त्यामुळे दसऱ्याच्या मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे एखादी महत्त्वाची घोषणा करायचे. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून शिवसैनिक बाळासाहेबांनी दिलेल्या विचारांची अंमलबजावणी करायचे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष बाळासाहेब कोणती घोषणा करतात याकडे असायचे. बाळासाहेब असतानाचा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर व्हायचा. मात्र बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर शिवसेनेची दोन शकले झाली. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने त्यांच्यासोबत लोकप्रतिनिधींचा मोठा गट शिवसेनेतून बाहेर पडला. त्यामुळे निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता दिली. हिंदुत्व आणि राजकीय वारसा म्हणून एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असली तरी, बाळासाहेबांनी स्थापन केलेली म्हणून लोकांच्या दृष्टीने कौटुंबिक वारसा हक्क उद्धव ठाकरे यांच्याकडे मानला जातो. शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणून शिवाजी पार्क मैदानावर हक्क शिंदे गटाचा की ठाकरे गटाचा, यासाठी कोर्टाचे दरवाजेही ठोठावण्यात आले. मेळाव्यासाठी मैदान मिळावे म्हणून आधी अर्ज कोणी केला, या तांत्रिक तपासात सन 2022 मध्ये शिवाजी पार्क मैदानात ठाकरे गटाचा दसरा मेळावा झाला. तर शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर झाला. त्यानंतर 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन वादावादी टाळण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने 2023 च्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानावर दावा केला नाही. तेव्हा शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानात झाला. आता विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन, वादावादी टाळण्यासाठी 2024 च्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने शिवाजी पार्क मैदानावर दावा सांगणे टाळल्याचे दिसत आहे.  त्यांचा दसरा मेळावा बीकेसी एमएमआरडी ग्राउंडवर होणार होता. पण अचानक या निर्णयात बदल करण्यात आला. आता यंदाचा तिसरा मेळावा सुद्धा आझाद मैदानावर होत आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा रक्षाबंधनाचा सण मोठ्या दणक्यात झाला. अनेक बहिणींनी त्यांना राख्या बांधल्या. त्याचप्रमाणे तिसऱ्या हप्त्याची ओवाळणी देत मुख्यमंत्र्यांचा भाऊबीज सणही मोठ्या दणक्यात होणार आहे. त्यासाठी दसरा मेळाव्याला मोठ्या प्रमाणात बहिणींची, त्याचप्रमाणे लाडक्या भावांची आणि विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. बीकेसीतील एमएमआरडीए मैदान वांद्रे आणि कुर्ला स्थानकापासून लांब अंतरावर असल्याने वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन अचानक हा निर्णय बदलण्यात आला आहे. त्यामुळे आझाद मैदानात मेळाव्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीचा हा मेळावा असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेकडून मोठमोठे खुलासे, दावे, आश्वासन त्यासोबतच इतर पक्षातील नेत्यांचे पक्ष प्रवेश करून विधानसभेचे रणशिंग फुंकण्याची जोरदार तयारी चालले असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. त्यासाठीच हा मेळावा बीकेसीऐवजी आझाद मैदान येथे घेण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.