राज्यात आज दसरोत्सव
पणजी : गोव्यात आज पारंपरिक पद्धतीने दसरोत्सव साजरा करण्यात येणार आहे. दसरा हा शुभदिन समजला जातो. यानिमित्त गोव्यात सर्वत्र धार्मिक व पारंपरिक भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा’ असे म्हटले जाते. आजच्या या शुभदिनी अनेक आस्थापनांचे उद्घाटन केले जाईल. अनेक प्रकल्पांसाठी शिलान्यास बसविण्याचे कार्यही होईल. घराला तोरण बांधून, रांगोळी घालून हा शुभदिन साजरा केला जाईल. आपल्या वाहनाला झेंडूची फुले व आंब्याच्या पानांचा हार अर्पण करून वाहनांची पूजा केली जाईल. मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आज नवरात्रोत्सवाची सांगता होत असून मंदिरांतून श्रींची पालखी तसेच काही मंदिरांमधील प्रसिद्ध तरंगे गावातून फिरवली जाणार आहेत. अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये भाविकांना कौल दिला जाईल. सायंकाळी सिमोल्लंघन व त्यानंतर आपट्याची व शमीची पाने एकमेकांना देऊन सोने लुटण्याची परंपरा पाळली जाईल.