म्हैसुरात दसरोत्सव पर्वाला प्रारंभ
बूकर पुरस्कार विजेत्या लेखिका बानू मुश्ताक यांच्या हस्ते चालना
प्रतिनिधी/ बेंगळूर
जगभरातील लाखो पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या आणि राज्याची कला, सांस्कृतिक, इतिहासाचे दर्शन घडविणाऱ्या विश्वविख्यात म्हैसूर दसरोत्सवाला सोमवारपासून प्रारंभ झाला. त्यामुळे सांस्कृतिकनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हैसूर शहरात पुढील 10 दिवस विविध भरगच्च कार्यक्रम होतील. बूकर पुरस्कार विजेत्या लेखिका बानू मुश्ताक यांनी चामुंडी टेकडी येथे जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित कार्यक्रमात चांदीच्या रथात विराजमान चामुंडेश्वरी मूर्तीवर पुष्पवृष्टी करून दसरोत्सवाला चालना दिली. तर दुसरीकडे म्हैसूर वडेयर राजघराण्यातही दसऱ्याच्या शाही पर्वाला प्रारंभ झाला.
म्हैसूर दसरोत्सवाच्या उद्घाटक बानू मुश्ताक व इतर मान्यवरांचे सकाळी चामुंडी टेकडीवर नंदीध्वज, मंगलवाद्ये व विविध कलापथकांनी भव्य स्वागत करण्यात आले. पूर्णकुंब स्वागतानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आदीदेवता चामुंडेश्वरी देवीचे अग्रपूजा करण्यात आली. त्यानंतर 10:10 ते 10:40 या कालावधीतील शुभ मुहूर्तावर बानू मुश्ताक यांनी व्यासपीठावर चांदीच्या रथातील विराजमान चामुंडेश्वरी देवीची पूजा करून दसरोत्सवाचा शुभारंभ केला. म्हैसूर जिल्हा पालकमंत्री डॉ. एच. सी. महादेवप्पा, मंत्री शिवराज तंगडगी, के. वेंकटेश, एच. के. पाटील, आमदार रमेश बंडिसिद्धेगौडा, अनिल चिक्कमादू तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यंदा 11 दिवसांचा दसरोत्सव असून म्हैसूरनगरी विद्युत रोषणाईने झळकली आहे. देश-विदेशातील पर्यटकांची रिघ लागणार असून विश्वविख्यात अंबाविलास राजवाडा, शहरातील मुख्य रस्ते व चौकांमधील विद्युत रोषणाई, फळे-पुष्प प्रदर्शन, फुड फेस्टिव्हल, शेतकरी दसरा, सांस्कृतिक कार्यक्रम, दसरा पुस्तक मेळावा, दसरा कुस्ती, महिला दसरा, रंगायन नाट्या महोत्सव आणि प्रदर्शन यांची रेलचेल राहणार आहे.
कडेकोट बंदोबस्त
राज्य सरकारने बूकर पुरस्कार विजेत्या बानू मुश्ताक यांना दसरोत्सव उद्घाटक म्हणून निवड केल्याने वाद निर्माण झाला होता. हा मुद्दा उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयातही गेला होता. काही राजकीय पक्षांनी सरकारवर परखड टिकाही केली होती. दरम्यान, सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर दसरा उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये याकरिता व्यापक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

राजवाड्यातही शाही दसरोत्सवाला प्रारंभ
म्हैसूर जिल्हा प्रशासनाकडून शहरात दसरोत्सव साजरा केला जात असताना दुसरीकडे जगप्रसिद्ध अंबाविलास राजवाड्यात वडेयर राजघराण्याकडून पारंपरिक पद्धतीने शाही दसरोत्सवाला प्रारंभ झाला. सोमवारी वडेयर राजघराण्याचे वंशज आणि खासदार यदुवीर कृष्णदत्त चामराज वडेयर यांनी राजवाड्यात खासगी दरबार भरवून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
सोमवारी सकाळी 5:30 ते 5:45 दरम्यान सिंहासनाची जोडणी करण्यात आली. कंकन धारणानंतर सकाळी 11:35 वाजता राजवाडा आवारातील सोमेश्वर मंदिरात पूजा करण्यात आली. नंतर मानाचा हत्ती, घोडा, गाय यांची पूजा करण्यात आली. सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक परंपरेनुसार यदुवीर वडेयर यांनी राजेशाही पोषाख परिधान करत 11 व्यांदा राजदरबार भरविला. तत्पूर्वी राजवाड्यातील पुजाऱ्यांनी म्हैसूरमधील 23 मंदिरांमधून आणलेले तीर्थ शिंपडून रत्नजडीत सुवर्णसिंहासनाची पूजा केली.
म्हैसूर दसरा हा सर्वांना एकत्र आणणारा सौहार्दाचा मेळा : बानू मुश्ताक
म्हैसूर दसरा हा सर्वांना एकत्र आणणारा सौहार्दाचा मेळा आहे. दसरा हा केवळ उत्सव नाही, तर तो राज्याच्या संस्कृतीचा उत्सव आहे. संस्कृती म्हणजे विविध आवाजांचा संगम आहे. विविधतेत एकतेचा सुगंध आहे. येथील संस्कृती ही हृदयांना प्रेरणा देणारी धार्मिक श्रद्धा आहे. चामुंडेश्वरी देवीच्या कृपेणे या व्यासपीठावरून तुमच्यासमोर उभे राहण्याची संधी मिळणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे, असे प्रतिपादन दसरोत्सवाच्या उद्घाटक बानू मुश्ताक यांनी केले.