कडोलीतील दसरोत्सव उत्साहात, पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार
वार्ताहर/कडोली
नुकताच पार पडलेल्या कडोली येथील ऐतिहासिक दसरोत्सव सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यास मोलाची भूमिका निभावलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा ग्रा. पं., देवस्थान पंचकमिटीसह विविध संस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. दरवर्षी कडोली येथील ऐतिहासिक दसरोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांच्या नाकीनऊ येते. कारण समस्त बेळगाव जिल्ह्यातील तरुणाईचे पाय कडोली दसरोत्सवाकडे वळलेले असतात. कोणाचा राग कोणावर असतो याचा थांगपता नसतो. यावर्षी कडोली गावातील प्रमुख रस्त्यावर 16 हून अधिक डॉल्बिंना परवानगी दिली होती. या डॉल्बीच्या नादावर संपूर्ण दिवसभर तरुणाई थिरकत होती. या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये. यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला होता. शिवाय सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेरेद्वारे नजर ठेवली होती. पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि उपायुक्त नारायण बरमणी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सुरक्षेविषयी आढावा घेतला होता. कडोली गावचा दसरोत्सव सुरळीत कसा पार पडतो, अशी सर्वांच्या मनात शंका घर करून राहिली होती. पण पोलीस खात्याने डोळ्यात तेल घालून यात्रेवर नियंत्रण ठेवले होते. परिणामी सदर यात्रा सुरळीत पार पाडण्यास मदत झाली.