For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भगवंतांच्या अवतारकाळात सर्व जग आत्मसुखाने भरून जाते

06:51 AM Jan 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
भगवंतांच्या अवतारकाळात सर्व जग आत्मसुखाने भरून जाते
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

भगवंत अर्जुनाला म्हणाले, माझे स्वरूप अविनाशी असून मी अजन्मा आहे. सर्व भूतमात्रांचा ईश्वर आहे. आपल्या प्रकृतीला वश करून मी योगमायेने प्रकट होत असतो. माझे अवतार घेणे व संपविणे, हा आरशात दिसणाऱ्या प्रतीबिंबाप्रमाणे एक भास आहे. मुळात मी निराकारच आहे. परंतु ज्यावेळी मी मायेचा आश्रय घेतो, त्यावेळी कांही विशेष कार्यासाठी मी सगुण रूप घेतो. जेंव्हा जेंव्हा धर्माला ग्लानी येते आणि अधर्म बळावू लागतो तेंव्हा मी अवतार घेतो. अवतारकाळात सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करणे हे माझे कार्य असते. ह्या अर्थाचा

राखावया जगी संता दुष्टा दूर करावया । स्थापावया पुन्हा धर्म जन्मतो मी युगी युगी ।। 8 ।। हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार परमेश्वर भक्तांचा कैवार घेण्यासाठी देह धारण करून अज्ञानरूपी अंधकार पार नाहीसा करतात. भगवंत पुढे म्हणाले, स्वार्थ साधण्यासाठी लोक अधर्माने वागून उन्मत्त झालेले असतात. त्यांनी सर्व जगाची घडी विस्कटून टाकलेली असते. ते स्वत:ला अजिंक्य समजत असल्याने कसेही वागले तरी चालेल असे त्यांना वाटत असते. अशा लोकांना मी त्यांची मर्यादा दाखवून देतो. शास्त्राला सोडून आपल्या मनाप्रमाणे लोकांनी केलेले लिखाण फाडून टाकतो आणि सज्जनांकडून सुखाची ध्वजा उभी करतो. दैत्यांच्या कुळाचा नाश करतो, साधूंचा गेलेला मान पुन: मिळवून देतो आणि धर्म व नीतीची सांगड घालतो. विवेक दिपाला आलेली अविचाराची काजळी नाहीशी करतो आणि विवेकदीप प्रज्वलित करतो. असे सर्व स्थिरस्थावर झाले की, योग्याना अखंड आनंदाच्या दिवाळीचा अनुभव येतो. माझ्या अवतारकाळात सर्व जग आत्मसुखाने भरून जाते. फक्त धर्मच जगात नांदत असतो. भक्तांच्या हृदयात सात्विकतेचे भरते येते. त्यामुळे पापांचा पर्वत नाहीसा होतो आणि पुण्याची पहाट होते. ह्या कार्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो, माझे हे कार्य जो जाणतो, तो या जगात खरा विवेकी होय.

Advertisement

भगवंतांनी खरा विवेकी कुणाला म्हणावे हे येथे सांगितले. त्यावरून हे लक्षात येते की, जो निरपेक्ष आहे त्याला चांगले काय आणि वाईट काय हे स्पष्टपणे कळत असते आणि त्यामुळे तो त्याप्रमाणे अचूक वागत असतो तो खरा विवेकी होय. अर्थात असे लोक ह्या जगात फार थोडे असतात. तसं बघितलं तर चांगले काय आणि वाईट काय हे पुष्कळ जणांना कळत असतं परंतु त्याप्रमाणे चांगले वागायचे झाल्यास आपल्याला वाईटपणा येईल, आपल्याला हवं तसं घडणार नाही हे लक्षात आल्यामुळे संत वगळून इतर सर्वजण चांगले काय हे कळत असूनसुद्धा बेलाशक वाईट वागताना दिसतात. काही लोक तर ईश्वराला साक्षी ठेवून खोटं बोलतात.

पुढील श्लोकात भगवंत म्हणाले, माझे जन्म घेण्याचे कारण आणि मी करत असलेली दैवी कर्मे जो जाणतो, तो पुरुष देहत्यागानंतर पुन: जन्मास न येता मला येऊन मिळतो.

जन्म-कर्मे अशी दिव्य जो माझी नीट ओळखे । देह गेल्या पुन्हा जन्म न पावे भेटुनी मज ।।9।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतानी अर्जुनाला असे सांगितले की, मी अजन्मा असूनही माझे जन्म घेणे आणि निक्रिय असूनही कर्म करणे, हे माझे अविकारस्वरूप जो जाणतो, तो परममुक्त आहे. तो माझ्याप्रमाणेच इंद्रियाने कर्म करीत असला, तरी कोणत्याही प्रकारच्या आसक्तीने बांधला जात नाही. तो निरपेक्ष असल्याने, देहधारी असूनही देहभावाला वश होत नाही. त्याचा देह ज्यावेळी पंचतत्वांत विलीन होतो, त्या वेळी तो माझ्या स्वरूपी एकरूप होतो.

क्रमश:

Advertisement
Tags :

.