For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऐन परीक्षा काळात विद्यार्थ्यांची फरफट

06:01 AM Mar 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऐन परीक्षा काळात विद्यार्थ्यांची फरफट
Advertisement

बससेवा अनियमित, विद्यार्थ्यांची पायपीट, शैक्षणिक जीवनावर परिणाम

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या वार्षिक परीक्षांना प्रारंभ झाला आहे. मात्र, ऐन परीक्षा काळातच बससेवा विस्कळीत झाल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. आधीच शक्ती योजनेचा बोजा बसव्यवस्थेवर वाढला आहे, त्यातच परीक्षार्थी विद्यार्थ्यांची भर पडत असल्याने बससेवेचे तीनतेरा वाजू लागले आहेत. विशेषत: यामध्ये विद्यार्थीवर्गाची हेळसांड होऊ लागली आहे. त्यामुळे परीक्षा काळात तरी सुरळीत आणि नियमित बससेवा पाठवा, अशी मागणीही विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांतून होऊ लागली आहे.

Advertisement

11 ते 16 मार्च दरम्यान पहिलीपासून नववीपर्यंतच्या परीक्षा होऊ लागल्या आहेत. बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, वेळेवर बस मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा काळातही त्रास सहन करावा लागत आहे. 11 जूनपासून राज्यात शक्ती योजनेंतर्गत महिलांचा मोफत प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे महिला प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. त्याबरोबर पर्यटन आणि विविध यात्रा-जत्रांना जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बससेवेवर अतिरिक्त ताण पडू लागला आहे. परिणामी ग्रामीण भागात बससेवा अनियमित होऊ लागली आहे. त्यामुळे विद्यार्थीवर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

विद्यार्थ्यांनी बसपास काढले आहेत. मात्र, वेळेत बस नसल्याने खासगी वाहनाचाच आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंडही बसू लागला आहे. काही ठिकाणी खासगी वाहनांची देखील सोय नाही. अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचणे कठीण होऊ लागले आहे. काही ठिकाणी पालकांना स्वत: पाल्याला परीक्षा केंद्रापर्यंत सोडण्याची वेळ आली आहे. सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत बसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे लहान वर्गातील बालकांना बसमध्ये चढणे जीवघेणे ठरू लागले आहे. परीक्षेसाठी वेळेत पोहोचणे महत्त्वाचे आहे. या घाईगडबडीत विद्यार्थ्यांना दरवाजा लोंबकळतच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे परीक्षा काळातही विद्यार्थ्यांना धोकादायक प्रवासाला सामोरे जावे लागत आहे.

शक्ती योजनेमुळे महिला प्रवाशांची संख्या भरमसाट वाढली आहे. त्यामुळे विविध मार्गावर बससेवा अनियमित होऊ लागली आहे. काही ठिकाणी बसफेऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना तासन् तास ताटकळत थांबावे लागत आहे. विशेषत: ग्रामीण भागातील काही गावच्या बससेवा ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना घरी पोहोचताना रात्री उशिर होऊ लागला आहे. तर काही मार्गांवरील वस्तीच्या बस बंद झाल्या आहेत. त्यामुळे रात्री उशिराने प्रवास करावा लागत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. दुपारी परीक्षा संपली तरी घरी जायला विद्यार्थ्यांना रात्रीचे आठ वाजू लागले आहेत. त्यामुळे शैक्षणिक जीवनावर आणि अभ्यासावर देखील परिणाम होऊ लागला आहे. परिवहन याची दखल घेणार का? हेच आता पहावे लागणार आहे.

Advertisement
Tags :

.