Navratri 2025 : नवरात्रोत्सव काळात कोल्हापुरातील अंबाबाईच्या खजिन्यात 57 लाखांची भर
अंबाबाईच्या नवरात्रोत्सव मंगळवारी होणार सांगता
कोल्हापूर : गेल्या २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या नवरात्रोत्सव काळातून ५७ लाख १९ हजार ४४२ रुपये देणगी व इतर माध्यम स्वरुपातून अंबाबाई तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला उत्पन्न मिळाले आहे. तसेच संपूर्ण उत्सव काळात महाराष्ट्र व बाहेरील १६ लाख ४२ हजार लाखो भाविकांनी अंबाबाई मंदिरात प्रत्यश्न मंदिरात दाखल होऊन देवीचे दर्शन घेतले.
ज्यांना मंदिरात येणे शक्य होत नाही त्यांच्यासह महाराष्ट्रबाहेरील व देशाबाहेरील लाखो भाविकांनी देवस्थान समितीच्या ऑनलाईन पेजीसच्या माध्यमातून अंबाबाईचे दर्शन घेतले आहेत, अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाची सांगता मंगळवार ७ रोजी आहे. याचदिवशी नवान्न पौर्णिमाही आहे. या पौर्णिमेचे औचित्य साधून अंबाबाई मंदिरात महालक्ष्मी भक्त मंडळ व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती यांच्या वतीने हा महाप्रसाद करण्यात येणार आहे.
भाविकांचा दर्शनाला येण्याचा ओघ मुरुच
संपूर्ण नवरात्रोत्सव काळात महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांमधून अंबाबाईच्या दर्शनासाठी तब्बल १६ लाख ४२ हजार भाविक मंदिरात आले होते. याची ठळक नोंद देवस्थान समितीकडील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाकडे झालेली आहे. उत्सवानंतरही भाविकांचे देवीच्या दर्शनाला मोठ्या स्वरुपात येणे सुरु आहे. सुट्टीचे औचित्य साधून गेल्या शनिवारी ४२ हजार व रविवारी ७५ हजार १०४ भाविक अंबाबाईच्या दर्शनाला आले होते.
या भाविकांमध्ये सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, पिंपरी चिंचवड, पुणे, नाशिक, मुंबई, वर्धा, लातूर यासह विविधजिल्ह्यांमधील भाविकांचा समावेश होता. सकाळपासून दुपारी ३ वाजेपर्यंत दर्शन मंडप भाविकांनी सतत भरतच राहिला होता.
दिवसभरात अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर भाविक कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन करण्यासाठी पन्हाळगड, जोतिबा डोंगर, खिद्रापूर, विशाळगड, नृसिंहवाडीकडे जात राहिले. त्यामुळे सकाळी १० वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंतच्या कालावधीत भाविकांची वाहने रस्त्या रस्त्यावर दिसत होती.