गणेशोत्सवात जिल्ह्यातून 342 जण तडीपार
सातारा :
गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या दोन्ही सणाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिह्यातून तडीपारी कारवाईचा धडका पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी लावला आहे. यामध्ये अवैध धंदे करणारे आणि सराईत आरोपींचा समावेश आहे. दि. 5 सप्टेंबर पासून 7 सप्टेंबरपर्यंत जिह्यातील 342 जणांना जिह्यातून हद्दपार करण्यात आलं आहे. गणेशोत्सवात मिरवणुकी दरम्यान ज्याच्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा संशयितांवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्सव काळात चांगली वागणूक आणि शांतता राखणार असल्याचा बॉण्ड देखील 476 जणांकडून लिहून घेण्यात आला आहे.
सातारा जिह्यात चोरी, दरोडा, लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस एक्शन मोडवर पाहायला मिळत आहेत. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेला धक्का पोहचवणाऱ्यांची गय केली जाणार नसून महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅम्रेयाच्या माध्यमातून पोलिसांची करडी नजर राहणार आहे. नागरिकांनी शांतता, शिस्त आणि सामंजस्य राखून सण साजरा करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
- पोलीस ठाणे - तडीपार संख्या
1) सातारा शहर - 142
2) कराड शहर - 55
3) कराड तालुका - 42
4) शाहुपुरी - 45
5) दहिवडी - 15
6) उंब्रज - 18
7) लोणंद - 10
8) मसूर - 12
9) बोरगांव - 2
10) तळबीड - 1
एकूण - 342